

मुंबई : हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकीच आहे, आगे आगे देखो होता है क्या..., असा इशारा देत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आणखी फोडण्याचे स्पष्ट संकेत शुक्रवारी झालेल्या शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात दिले. ठाकरे गटाचे सहा खासदार फोडल्यानंतर महाराष्ट्राचे व शिवसेनेचे राजकारण ढवळून निघाले असतानाच ठाकरे सेनेचे अनेक नेते वेटिंगवर असल्याचे शिदे म्हणाले. रक्ताचे नाते सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे आपणच वैचारिक वारस असल्याचा पुनरुच्चार केला.
गेला महिनाभर चाललेले ऑपरेशन टायगर यशस्वी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेचे सहा खासदार फोडले. त्यांची गटस्थापना अद्याप झालेली नाही. ओघानेच हे खासदार अद्याप शिदे सेनेत दाखल झालेले नाहीत. कदाचित त्यामुळेच ठाकरेंना सोडून बाहेर पडलेल्या सहा पैकी एकही खासदार शुक्रवारी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या ६०व्या वर्धापनदिन मेळाव्याच्या मंचावर उपस्थित नव्हता. मात्र, शिंदे यांचे संपूर्ण भाषण उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवत याच ऑपरेशन टायगरभोवती फिरले. खासदार श्रीकांत शिंदे यांना युवा सेनेचे प्रमुख करा, त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका, अशी मागणी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केली. त्यावर श्रीकांत यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला तुमच्यावर सोपवतो, असे सांगत शिंदे यांनी आपल्या चिरंजीवांच्या राजकीय लाँचिगची जबाबदारी नेत्यांवर सोपवली.
उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही, ते तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागते. रक्ताचे नाते सांगून, सातबारावर आपले नाव लावून कुणाला वारस होता येत नाही, शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर तो आमच्यातुमच्या काळाजाचा तुकडा आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना त्रास दिला, गेल्यानंतर बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता त्यांचा पुरस्कार तुम्ही करता ही तुमची वारसदारी! समोर बसलेले शिवसैनिक हीच माझी खरी संपत्ती आणि वैभव आहे. शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झाला. हिंदुत्वाचा हुंकार, मराठीचा निर्धार, सर्वसामान्यांचा आधार आणि शेतकरी, वारकरी, महिलांच्या सन्मानासाठी लढणारे नाव म्हणजे शिवसेना असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
टायगर तुमच्या समोर आहे
अनेकांच्या आपल्याकडे नजरा लागल्या होत्या की शिंदे काय बोलणार, व्यासपीठावर कोणकोण येणार? आज काय होणार? पण टायगर तुमच्यासमोर उभा आहे. परवापासून काही कुत्री रोज भुंकत आहेत, पण कुत्री झुंडीने येतात, वाघ एकटा येतो, कुत्रे नुसते भुंकतात पण टायगर शिकार करतो, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धवसेनेच्या नेत्यांना इशारा दिला. ते म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम केले, विचार जिवंत ठेवण्याचे काम केले, त्यांना तुम्ही शिव्या देता. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादीने आणि दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली त्यांच्यासाठी आता ओव्या गाता आणि ज्यांनी गहाण टाकलेला धुन्यष्यबाण सोडवला, विचार पुढे नेण्याचे काम केले त्यांना शिव्या देता, असेही शिंदे यांनी सुनावले.
आत्मपरीक्षण करा
सततच्या पक्षफुटीबद्दल उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. शिंदे म्हणाले, ते सांगतात, ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा, पण त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुटतोय. जा जा म्हणून सगळेच जावू लागलेत. का जाऊ लागले याचे जरा आत्मपरिक्षण करा. आता फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहेत! असे असेल तर कसा वाढणार पक्ष? 'तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नही, कमाल ये है की, फिर भी तुम्हे यकीन नही.', असा शेर ऐकवत ठाकरेंच्या सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धवसेनेकडून होणाऱ्या टीकेला शिंदे यांनी उत्तर दिले.
हिंमत असेल तर समोर या
शिंदे म्हणाले, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. चार वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी मला धमक्या दिल्या होत्या, मुंबईत तर यावेच लागेल, वरळीतून जावेच लागेल. तेव्हा एकनाथ शिंदे एकटा आला, वरळीत येऊन थांबला, तेव्हा धमक्या देणारे घरात बसले होते. आता म्हणतात तुडवा, हिंमत असेल तर समोर या, तुडवायला हे शिवसैनिक पाय जागेवर ठेवतील का? हे शिवसैनिक बाळासाहेब आणि दिघेंच्या कडव्या विचारांचे आहेत. सेनापतीने घरी बसून चालत नाही, समोर येऊन लढावे लागते. हा एकनाथ शिंदे तुमच्यासमोर येऊन छातीचा कोट करून लढणारा लढवय्या आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसने मित्र संपवले
एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवरही टीका केली. आयपीएल टीम हरल्यानंतर कॅप्टन बदलतात, पण सतत निवडणुका हरल्यावरही राहुल गांधींच कॅप्टन आहेत, एवढ्या निवडणुका हरल्या तरी अध्यक्ष तेच, हे फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकते. राहुल गांधींचे भस्मासुरासारखे आहे. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात तो राख होऊन जातो. आपल्याकडे उबाठाला संपवले, तामिळनाडूत डीएमके, पश्चिम बंगलामध्ये ममता दीदींचे पानीपत केले, बिहारमध्ये आरजेडीला संपवले, राहुल गांधींनी काँग्रेसची वाट लावली पण ज्यांना बरोबर घेतले त्यांनाही संपवले, अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.
फडणवीस यांच्याशी वाद नाही
गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कटूता आल्याचे बोलले जात आहे. त्याचा संदर्भ घेत शिंदे यांनी दोघांमध्ये कुठलाही वाद नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, महायुती मजबूत आहे. तीनही पक्षांचे बॉण्डींग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यातही काही लोक काड्या करण्याचा करत आहेत, त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. 'कुछ लोग छुपछुप कर जा के उन्हें बतातें है, अरे पर वो हमें आके सबकुछ बतातें है,' कारण आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवणे आहे, त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यात नात्यात फरक पडणार नाही, असे शिंदे म्हणाले.
मोदी, शहांचे कौतुक
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे कौतुक केले. १२ वर्षांच्या कारकिर्दीत मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. ३३ देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कार दिला आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे ही बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्ने होते, ते मोदींनी पूर्ण केली. अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद संपवला, असे शिंदे म्हणाले.