NCP politics | राष्ट्रवादीतला कलह

mumbai vartapatra
mumbai vartapatra
Published on
Updated on

मृणालिनी नानीवडेकर

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे राजकारण सध्या अंतर्गत संघर्ष, फुटी आणि नेतृत्वाच्या प्रश्नांमुळे कमकुवत होताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनी नव्या पिढीच्या नेतृत्वासमोर पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एकेकाळी महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष राज्याचे राजकारण चालवायचे. महाराष्ट्रातले सरकार कुणाचे हे ठरवण्याचा निर्णय राष्ट्रीय नव्हे तर येथील प्रादेशिक पक्ष घ्यायचे. आता हे प्रादेशिक पक्ष ताकद गमावून बसले आहेत. अंतर्गत सत्तासंघर्ष पक्षाची ताकद पोखरतो आहे. शिवसेनेने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद हा विषय प्रतिषठेचा केला. भाजप जिंकून सत्तेत आले नाही. पण नंतर सत्तेत असलेल्या शिवसेनेतील संघर्षामुळेच सरकार गेले. बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा ही मुंबई चालवणारी अद्भुत शक्ती होती. आता तो जमाना गेला. एकी संपली, सत्ता गेली. आधी राज्यातली अन् नंतर मुंबईतली. शिवसेनेत दुफळी माजली, त्याच पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार वेगळे झाले. त्या बंडाचे भाजपवर उपकार आहेत. मात्र त्यांच्या दुर्दैवी आणि अकाली निधनानंतर आता फुटलेल्या राष्ट्रवादीत आणखी फूट तर नाही ना पडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यकारिणीचे पदाधिकारी घोषित झाले अन् कुरकुरीला तोंड फुटले. राजी - नाराजी तुकडे पडेपर्यंत ताणली जाऊ नये यासाठी भाजप कामाला लागला आहे. भाजपने केलेली उपाययोजना राष्ट्रवादी काँग्रेसला तारू शकेल. अजित पवारांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने जर्जर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कर्त्याधर्त्यांना भाजपने सुचवलेले औषधोपचार अमान्य असतील तर पक्ष आयसीयूत जायची वेळ येईल, अशी स्थिती आली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्षाचा कारभार हाकणारे धुरीण कारभारातून बाजूला ठेवायचा प्रयत्न झाला. त्याची सर्वत्र हाकाटी पसरली. बड्या नेत्यांना कार्यकारिणीत पदावनत केल्याने गोंधळ झाला आणि आता अखेर मित्रपक्षाच्या वादात भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागते आहे.

पूर्वी स्वतःचा पक्ष सांभाळतानाच अन्य पक्ष चालवायचे, तेथील बेदिली सांधण्याचे जबाबदारीचे काम शरद पवार यांच्यावर पडे. आता ती भूमिका फडणवीस पार पाडताहेत असे दिसते. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खरे तर विधानसभेत मजबूत जागा जिंकल्या आहेत. पक्षात दुफळी माजली असताना शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जागा निवडून आल्या. या जागा लक्षणीय तर आहेत; शिवाय त्या भाजपचे फारसे संघटनात्मक काम नसलेल्या भागातील आहेत. जेथे भाजपची संघटना प्रभावीपणे आजवर पोहोचू शकली नाही, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. अशा वेळेला खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रत्येक नेत्याने परस्परांना धरून ठेवून आगामी वाटचाल दमदार कशी करता येईल ते ठरवणे आवश्यक होते. त्यातून शक्ती वाढली असतीही. पण तसे न होता पार्थ पवार यांनी त्यांच्या मर्जीनुसार मनमानी केली, असा आरोप दुसर्‍या गटाकडून होतो आहे. वस्तुतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन कथित अन्यायग्रस्त नेत्यांनी या विषयावर कोणतेही विधान केलेले नाही. उलटपक्षी पक्षात कोणतीही बेदिली नाही, असाच पवित्रा तटकरे यांनी घेतला आहे. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांच्या कुटुंबासमवेत असणार हे सरळ आहे. आता दादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर या सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आलेली आहे. त्या तशी पावलेही उचलताना दिसतात. त्यात त्यांना त्यांच्या मुलांची मदत होतेय का हा प्रश्न आहे. फडणवीस यांनी पार्थ यांना सर्वांना बरोबर घेऊन चला, असा सल्ला दिला असावा. कारण राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षात कोणत्याही प्रकारचे वादळ निर्माण होऊ नये ही सध्या तरी भाजपची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी ते निवडणूक येईपर्यंत पार पाडतील. मात्र पक्षातील गट परस्परांशी जुळवून घेत नाहीत, असे लक्षात आले तर राजकारणात या वादाचाही उपयोग करून घेतला जाईल.

पार्थ पवार आणि त्यांच्या तरुण सहकार्‍यांच्या हे लक्षात आले आहे का? पार्थ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोमिलन बैठक होणार असल्याचीही चर्चा आहे. स्वतः सुनेत्रा पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. आज या पक्षात कोणाला बंड करायचे असेल तरी दादांबद्दलची सहानुभूती आणि पक्षाच्या मागे असलेले मराठा समाजाचे बळ हे लक्षात घेता सध्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळणे हे दुरापास्त आहे. अर्थात त्यांच्या मागे लोक नसतील, असे गृहीत धरले तरी त्यांना दुखावणे योग्य नाही. याबाबत सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी केली असावी असे दिसते. तरुण रक्ताला बरोबर घेऊन चालणे हे त्यांच्या समोरचे आव्हान आहे. त्यातच पार्थ मुलगा असल्यामुळे त्याला समजून घेण्याचे कामही सुनेत्रा पवार यांच्यावर आले असणार. पार्थ नव्या दमाचे नेते आहेत. ते पित्याचा वारसा पुढे नेतील ही अपेक्षा. प्रादेशिक पक्षांचे दिवस संपले आहेत असे सध्या तरी दिसते. महाराष्ट्र त्यातून बोध घेईल काय?

तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या नेतृत्वातील टीव्हीके पक्षाने निवडणूक जिंकली. जनतेच्या प्रश्नांना हात घातला तर पक्ष वाढतो. पंधरा वर्षांच्या सत्तेला जनता कंटाळते. पर्याय असेल तर तो निवडला जातो. पण त्यासाठी राजकीय पक्ष बांधावे लागतात. गाव तेथे सेना काढली म्हणून बाळासाहेब ठाकरे सत्तेत येऊ शकले. त्यांच्या वक्तव्यामुळे, भूमिपुत्रांचे प्रश्न हाती घेण्याच्या धोरणामुळे सेना विस्तारली. प्रादेशिक पक्षांचे राजकारण महाराष्ट्राच्या चांगलेच अंगवळणी पडले, किंबहुना मुख्य पक्षांना प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी केल्याशिवाय महाराष्ट्राचे मैदान मारता येत नाही याची जाणीव झाली. आता मात्र महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांची स्थिती चिंता करण्यासारखी होते आहे. यातले महत्त्वाचे असलेले दोन पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत उभी झालेली शिवसेना आणि काँग्रेसच्या दिल्लीकर नेतृत्वाने केलेले अपमान सहन न झाल्याने वेगळी चूल मांडून राजकारण यशस्वी करून दाखवणारे शरद पवार. बाळासाहेबांची शिवसेना खरे तर तीन तुकड्यांमध्ये वाटली गेली आहे. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वारसा विभागला गेला. मोठी पडझड झाली. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षाचा भाजपने पाडाव केला. झुंझार नेत्या ममता बॅनर्जी पडल्या. महाराष्ट्रातले पक्ष काही शिकणार आहेत की नाही? भाजप सगळे बघत आहे. या सतत मेहनत करणार्‍या पक्षाचे विरोधक असतील किंवा मित्र दोहोंना कमळासमोर उभे राहायचे असेल तर स्वतःला मजबूत ठेवावे लागते. घराणेशाहीतून पद, सत्ता मिळते. ती टिकवणे, वाढवणे हे आव्हान असते. स्टॅलिनसारखा कर्तृत्ववान पिता असतानाही उदयनिधीला तामिळनाडूत स्वीकारले गेले नाही. पार्थ हे वास्तव लक्षात घेत सर्वसमावेशक राजकारण करतील तर त्यांच्या आईचा ते आधार होतील. अन्यथा काय होईल हे हा तरुण नेता समजून असेलच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news