हिंगोली

Hingoli News: साळवा येथे ट्रॅक्टर चोरीचा फिर्यादीच निघाला आरोपी

अविनाश सुतार

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टरचे हेड चोरीला गेल्याचा गुन्हा 29 ऑक्टोबररोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यात समांतर तपास करून फिर्यादीची विचारपूस केली असता फिर्यादीने फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर आपल्या मित्रास चोरी करण्यास सांगितल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिर्यादी नितीन गौतम इंगोले व त्याचा मित्र शेख अंनिस शेख गन्नी यास ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली केले. (Hingoli News)

29 ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नितीन गौतम इंगोले (रा. साळवा) याने सोनालिका ट्रॅक्टरचे हेड (एमएच 35 ए.क्यु. 1624) घरासमोरून चोरीला गेल्याची तक्रारी दिली होती. पोलीस पथकाने या गुन्ह्यातील फिर्यादी नितीन इंगोले यास विचारपूस केली असता ट्रॅक्टरचे हेड हे फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर घेतल्याचे सांगितले. तसेच उसणे वाहतुकीचे पैसे सुद्धा उचलल्याचे सांगितले. फिर्यादीची सखोल चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. (Hingoli News)

पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी पुन्हा फिर्यादीस विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी फिर्यादीने ट्रॅक्टरचे हेड फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने त्याचा मित्र शेख अनिस शेख गन्नी (रा. तोफखाना, हिंगोली) याच्या मदतीने चोरी करण्यास सांगितले. तसेच ट्रॅक्टर हेड चोरीची खोटी फिर्याद दिल्याचेही कबुली दिली. तसेच शेख अनिस यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने सांगितले की, फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्याकरिता व भरलेले डाऊनपेमेंट मिळविण्याकरिता फिर्यादीसोबत संगणमत करून कट रचून हेडची चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी ५ लाख रूपये किमतींचा मुद्देमाल जप्‍त करून दोघांना आखाडा बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT