हिंगोली : मराठा आरक्षणासाठी ठाकरे गटाच्या डॉ. रेणुका पतंगे यांचा राजीनामा | पुढारी

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी ठाकरे गटाच्या डॉ. रेणुका पतंगे यांचा राजीनामा

वसमत पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज (दि.२) वसमत तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. त्याबरोबरच राजकीय पदाधिकारी यांचे राजीनामे सत्र सुरुच राहिले आहे. आणखी एका राजकीय पदाधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांकडे राजीनामा सोपवला आहे.वसमत तालुक्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन वातावरण चांगलेच तापले आहे. साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्तारोको आंदोलनाबरोबरच आता राजकीय पुढाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर युवासेना युवती जिल्हा प्रमुख डॉ. रेणुका पतंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.

हिंगोली : राजकीय पुढाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू

मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसी संवर्गातून आरक्षणासाठी द्यावे यासाठी मागील आठ दिवसांपासून शहरासह तालुक्यात साखळी उपोषण, आमरण उपोषण व रास्तारोको आंदोलन केले जात आहे. तालुक्यात मराठा आंदोलन दिवसेंदिवस तापत असून आता राजकीय पदाधिकारी यांच्याकडून आरक्षणासाठी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम खासदार हेमंत पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती आणि आता युवासेना युवती जिल्हा प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजिनाम्यांत मागील गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत परंतु कुठल्याच सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ समाज भुमिका लक्षात घेता मराठा आरक्षण भेटेपर्यंत मी पक्षाच्या पदावर राहणे योग्य नसून युवासेना युवती जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. रेणुका पतंगे यांनी सांगितले. तसेच मराठा समाजास जोपर्यंत सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी समाजाशी एकनिष्ठ राहून त्यांना माझा माझा पुर्ण पाठिंबा राहील असेही राजीनामात नमूद केले आहे.

गुरुवारी मराठा समाजाच्या वतीने वसमत तहसिल कार्यालय समोर रास्तारोको करण्यात आला. तसेच कौठा टी पाँइंट, टाकळगाव येथे रास्तारोको करण्यात आला. यामुळे आसेगाव मार्गे नांदेड रस्ता बंद होता. तसेच वसमत औंढा, वसमत कुरुंदा, औंढा हिंगोली रस्ता बंद होता. तर वसमत येथील साखळी उपोषणात गुरुवारी खांडेगाव सर्कलच्या मराठा समाजाने साखळी उपोषण केले. तसेच माजी नगरसेवक रविकिरण वाघमारे व भगवान कोरडे यांनी बुधवारी ता.१ पासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

हेही वाचा 

Back to top button