हिंगोली

हिंगोली: लाख शिवारात ५ एकरातील सोयाबीनची गंजी जळून खाक

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख शिवारात आज (दि. १३) पहाटे ५ च्या सुमारास घडली. या घटनेत ५ एकरातील सोयाबीन जळून खाक झाले. शेतकरी सुरज लोंढे यांचे सुमारे तीन लाखांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लाख येथील शेतकरी सुरज कैलासराव लोंढे यांनी ५ एकर ४ गुंठ्यात सोयाबीनची पेरणी केली होती. चार दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी घातली होती. या सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर सुरज लोंढे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. तोपर्यंत जवळपास पूर्ण गंजी जळून खाक झाली होती. सोयाबीन पिकाला जवळपास ६० ते ७० हजार लागवड खर्च आला होता. सुमारे ५० क्विंटल सोयाबीन झाले असते, असे शेतकरी सुरज लोंढे यांनी सांगितले.

घटनेची माहिती महसूल विभाग, बासंबा पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी सुरज लोंढे अडचणीत आले आहेत. त्यांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT