हिंगोली

हट्टात भीषण आग! किराणा दुकान व घर जळून खाक; संसार उघड्यावर

काही क्षणातच संपूर्ण घर आणि शेजारील किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी

पुढारी वृत्तसेवा

हट्टा : येथील भाग्यनगर परिसरात आज, २१ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका घराला आणि किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. अज्ञात कारणामुळे लागलेल्या या आगीत मारोती एकनाथ धोत्रे यांचे घर आणि दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५ ते साडेपाच लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पहाटेच्या वेळी नागरिकांची धावपळ

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास धोत्रे यांच्या घरातून अचानक मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अवघ्या काही क्षणातच संपूर्ण घर आणि शेजारील किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

लाखोंचे साहित्य जळून भस्मसात

या दुर्दैवी घटनेत धोत्रे कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे. आगीच्या तीव्रतेमुळे घरातील व दुकानातील दोन डी-फ्रीज, एक डबल डोअर फ्रीज, एलईडी टीव्ही, कुलर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू, पलंग, कपाट, कपडे आणि दैनंदिन वापराचे घरातील फर्निचर व इतर सर्व संसारोपयोगी साहित्य तसेच किराणा दुकानातील संपूर्ण माल, धान्य आणि रोख रक्कम इत्यादी साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे धोत्रे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंचनामा पूर्ण, तात्काळ आर्थिक मदतीची मागणी

घटनेची माहिती मिळताच हट्टा येथील तलाठी निर्मले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा रीतसर पंचनामा केला आहे. हा अहवाल पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या आगीत सर्वस्व गमावलेल्या धोत्रे कुटुंबाला शासनाकडून आणि प्रशासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, जेणेकरून त्यांना पुन्हा उभे राहता येईल, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT