

Fire breaks out at farmer's house in Jintur taluka
जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जोगवाडा येथील गट क्रमांक ५६ मध्ये राहणारे आदिवासी शेतकरी मारोती देवबा वाळके यांच्या शेतातील घराला शनिवारी (दि.२) रात्री भीषण आग लागून संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या दुर्दैवी घटनेमुळे वाळके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा अचानक घरातून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसताच परिसरातील नागरिक आणि शेज-ारील शेतकरी मदतीसाठी धावून आले. ग्रामस्थांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग वेगाने पसरल्याने घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत गहू, ज्वारी, हरभरा, करडी, तूर, उडीद, सोयाबीन यांसह मोठ्या प्रमाणातील धान्य जळून नष्ट झाले. तसेच फर्निचर, कपडे, भांडी, घरगुती साहित्य, शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रेही पूर्णतः जळून खाक झाली. घरात ठेवलेली रोख रक्कमही आगीत नष्ट झाल्याने कुटुंबीयांसमोर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने वाळके कुटुंबीयांचा आक्रोश पाहून ग्रामस्थही हळहळले. घटनेची माहिती मिळताच चारठाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी वाकळे यांनी पंचनामा केला.
यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पीडित आदिवासी शेतकरी कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत, धान्य व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कुटुंब उघड्यावर, मदतीची गरज
या आगीत आदिवासी मारोती वाळके यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. घरासह संसारोपयोगी साहित्य, धान्यसाठा, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाल्यामुळे कुटुंबापुढे खाण्यापिण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कुटुंबीयांकडे राहण्यासाठी निवारा नाही. अंगावरचे कपडे वगळता काहीही शिल्लक राहिलेले नाही. ग्रामस्थांनी तात्पुरती मदत केली असली तरी शासनाकडून तातडीने आर्थिक सहाय्य, धान्य, निवारा व आवश्यक कागदपत्रांची पुनर्निर्मिती करून देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा या कुटुंबासमोर गंभीर जीवनसंघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.