Jalgaon news | शेतकऱ्यांच्या घामाचे 'मोती' आगीत खाक; महावितरणच्या ठिणगीने 'सोनं' झालं कोळसा

जळगाव जिल्ह्यात आगीचे तांडव : मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा अन् धरणगावात लाखो रुपयांचे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात
Jalgaon news | शेतकऱ्यांच्या घामाचे 'मोती' आगीत खाक; महावितरणच्या ठिणगीने 'सोनं' झालं कोळसा
Published on
Updated on

जळगाव : एकीकडे निसर्गाची साथ मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झालेला असताना, दुसरीकडे महावितरणचा निष्काळजीपणा आणि वाढत्या उन्हामुळे जळगाव जिल्ह्यात आगीचे तांडव पाहायला मिळत आहे. मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा आणि धरणगाव तालुक्यात शेतात लागलेल्या भीषण आगीत मका, ठिबक संच, चारा आणि पाइप जळून खाक झाले आहेत. या विविध घटनांमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुक्ताईनगर: ठिणगी पडली अन् स्वप्न जळाली

मुक्ताईनगर तालुक्यात दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. निमखेडी बुद्रुक शिवारात (गट नं. १७९) विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत संतोष नारायण बगे या शेतकऱ्याचा मका, पाइप आणि ठिबकच्या नळ्या जळून तब्बल ४ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. दुसरी घटना बोरखेडा शिवारात (गट नं. ७९) घडली, जिथे नवल हरी पाटील यांच्या रब्बी हंगामातील मका, ठिबक, मोटर व केबल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात १ लाख २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल अशोक जाधव करत आहेत.

मारवाड (अमळनेर): साठवून ठेवलेला मका झाला कोळसा

अमळनेर तालुक्यातील लोण पंचम शिवारात संजय प्रल्हाद पाटील यांच्या शेतात (गट नं. ७) साठवून ठेवलेला १५० ते २०० क्विंटल मका आणि १ हेक्टर ६३ आर क्षेत्रातील ठिबक संच भीषण आगीत जळाले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास निलेश वानखेडे यांनी आग लागल्याची माहिती दिली. गावकरी आणि अग्निशमन दलाने आग विझवली असली, तरी तोपर्यंत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. मारवाड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून मुकेश साळुंखे अधिक तपास करत आहेत.

पारोळा: डीपीच्या शॉर्टसर्किटचा फटका

पारोळा तालुक्यातील खेडी ढोक येथील ठाणसिंग मांगो पाटील यांच्या शेतात इलेक्ट्रिक डीपीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत १ लाख रुपये किमतीचे मका कणसे आणि चारा जळून खाक झाला. ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता सर्व काही डोळ्यादेखत जळून गेले. पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

धरणगाव: वारा आला अन् होत्याचे नव्हते झाले

धरणगाव तालुक्यातही दोन ठिकाणी आगीचा भडका उडाला. खर्दे बुद्रुक शिवारात (गट नं. ९१) वादळामुळे महावितरणच्या तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. यात दौलत निंबा पाटील यांचा ८० हजारांचा मका आणि ४० हजारांचे ठिबक जळाले. तर दुसरीकडे, बांभोरी बुद्रुक येथील कैलास निंबा पाटील यांच्या बोरगाव शिवारातील (गट नं. १४०/४ व १३९/३) शेतात डीपीवरील स्पार्किंगमुळे आग लागून मका आणि दादरचे पीक जळून खाक झाले. पोलीस कॉन्स्टेबल किशोर भोई आणि दीपक पाटील पुढील तपास करत आहेत.

महावितरणवर संताप, मदतीची मागणी

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा आणि उघड्या डीपींमुळे आग लागल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. हातातोडाशी आलेला घास आगीने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा रडकुंडीला आला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news