हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा बुधवारी (दि.२) विधीमंडळात हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी गोळीबार प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. Hingoli crime news
पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा हिंगोली (Hingoli crime news) पोलिसांनी लावला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. परंतू, पप्पु चव्हाण यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून इतर काहींची नावे घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, बुधवारी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा प्रश्न उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुटकुळे यांनी केली.
हिंगोलीतील भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद आवारात मंगळवारी (दि.१) दुपारी ३ च्या सुमारास गोळीबार झाला. यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या पाठीत लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत हल्लोखोरांचा तपास सुरू करण्यात आला.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आज आले होते. ते ३ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून जिल्हा परिषदेच्या आवारात आले. त्यावेळी तेथे असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ते बचावासाठी खाली वाकले. त्यामुळे दोन गोळ्या त्यांच्या पाठीत घुसल्या, असे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. तर दोन गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.
हेही वाचा