Hingoli News : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा | पुढारी

Hingoli News : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आज (दि.२१) हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. भर पावसात काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ विभागीय वन अधिकार्‍यांशी चर्चा करीत शेतकर्‍यांनी न्याय देण्याची मागणी केली. (Hingoli News)

जिल्हाभरात वन्य प्राण्यांमुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. निलगाय, रानडुक्‍कर, हरीणांच्या कळपामुळे कोवळ्या पिकांची नासाडी होत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा त्रास शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. कर्ज काढून पेरणी केली. तर वन्य प्राणी उभे पिकेच फस्त करीत आहेत. (Hingoli News)

त्यामुळे गांधी चौकातून हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. भर पावसात मोर्चा दुपारी 1 च्या सुमारास विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी तुपकर यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी मोहन गोखले यांच्याशी चर्चा करण्यासाठी शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ रवाना झाले. यावेळी तुपकर यांच्यासह राजेश पाटील गोरेगावकर, गजानन कावरखे, नामदेव पतंगे यांनी शेतकर्‍यांची परिस्थिती गोखले यांना सांगितली.

Hingoli News  थेट वनमंत्र्यांनी दिले आश्‍वासन

डीफओ गोखले यांच्या दालनात तुपकर यांनी शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी करताच गोखले यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शेतकर्‍यांच्या मागण्यांची माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार यांनी शेतकर्‍यांना तार कुंपणांसाठी निधी देण्याबरोबरच वन्य प्राण्यांपासून पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईमध्ये येत्या अधिवेशनात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे सांगितले. वन मंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर शेतकर्‍यांनी मोर्चा मागे घेतला.

हेही वाचा 

Back to top button