Hingoli crime news : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर पसार | पुढारी

Hingoli crime news : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर पसार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीतील भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद आवारात आज (दि.१) दुपारी ३ च्या सुमारास गोळीबार झाला. यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या पाठीत लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli crime news)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत हल्लोखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे. रूग्णालयासमोर चव्हाण समर्थकांनी गर्दी केली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी धाव घेतली. (Hingoli crime news)

हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आज आले होते. ते ३ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून जिल्हा परिषदेच्या आवारात आले. त्यावेळी तेथे असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ते बचावासाठी खाली वाकले. त्यामुळे दोन गोळ्या त्यांच्या पाठीत घुसल्या, असे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. तर दोन गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.

तर पप्पू चव्हाण यांना उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तेथेही भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी करीत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा जमला होता.

पप्पू चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांना पाठीत दोन गोळ्या लागल्या. तरीही त्यांनी त्याच अवस्थेत कार चालवत एक खाजगी रुग्णालय जवळ केले. या रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

जखमी अवस्थेतील पप्पू चव्हाण यांना हिंगोली येथून नांदेडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांना येथील रुग्णालयातून हलवीत असताना आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर गर्दी केली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वान पथकाने काही अंतरापर्यंत हल्लेखोरांचा माग काढला. या सोबतच घटनास्थळापासून काही अंतरावरच एक मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यावरून तसेच जिल्हा परिषदेेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये या दोघांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले. घटनास्थळावर सापडलेल्या गोळ्या तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविल्या जाणार आहेत. गावठी पिस्टलमधून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोलीत सुमारे एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. या वादातून दोघा संशयितांनी चव्हाण यांच्यावर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा  

Back to top button