परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धनगरमोहा शेतशिवारात रानडुकराच्या जोरदार हल्ल्यामध्ये ५० वर्षीय शेतकरी मग्रध्वज मारोतराव तरडे हे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. २५) रोजी सायंकाळी ८ वाजता ही घटना घडली आहे. तालुक्यातील धनगरमोहा शिवारात मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी हैदोस माजवला आहे. याबाबतीत प्रशासनाला वारंवार कळवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बुधवारी (दि. २५) रोजी सायंकाळी ८ वाजता शेतकरी मग्रध्वज मारोतराव तरडे हे शेतात कामानिमित्त गेले असता अचानक झालेल्या रानडुकराच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी शेतकऱ्यावर परळी वैजनाथ येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.