First woman Deputy CM of Maharashtra
भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : जिल्ह्याचे नाव डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत अनेकदा आले; पण नशिबाची साथ न मिळाल्याने ती संधी हुकली. आता मात्र उपमुख्यमंत्रीपदावर जिल्ह्याची लेक विराजमान झाल्याने मुख्यमंत्रीपद हुकल्याची हुरहुर काहीशी भरून निघाली आहे.
डॉ. पाटील यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुनेत्रा अजित पवार यांची या पदावर निवड झाल्याने, विकासकामांच्या बाबतीत ‘माहेर’ला झुकते माप मिळेल, अशी आशा सामान्य जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे. तेर हे सुनेत्राताईंचे माहेर असून डॉ. पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू आहेत.
अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पत्नी सुनेत्रा यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना डॉ. पाटील हेही सातत्याने मंत्रीमंडळात असायचे. या दोन्ही नेत्यांच्या घट्ट मैत्रीतूनच अजित पवार आणि सुनेत्राताईंचा संसार आकाराला आला.
प्रत्येक महत्त्वाचा घरगुती कार्यक्रम असला, की सुनेत्राताईंची तेरला भेट ठरलेली असते. त्यामुळे माहेरची ओढ त्यांना असल्याचे यातून स्पष्ट होते. ज्येष्ठ बंधू डॉ. पाटील वयोमानामुळे सध्या राजकारणात सक्रिय नसले, तरी कुटुंबाची मोट बांधून ठेवणारा मुख्य धागा म्हणून ते आजही आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे पुत्र, म्हणजेच सुनेत्राताईंचे भाचे राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत.
सुनेत्राताईंना राजकीय वारसा माहेरकडून जसा लाभलेला आहे, तसाच तो सासरकडूनही वैभवशाली आहे. त्यामुळे राजकारण हा विषय त्यांच्यासाठी नवा नाही. दोन-अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय नाट्यानंतर अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर काही दिवसांतच अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी संधी देत विजयी केले. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, रक्षाविसर्जनाच्याच दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्राताईंचे नाव चर्चेत आले. त्यानंतर शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.
आता जिल्ह्याचीच लेक ‘नंबर दोन’च्या अतिशय महत्त्वाच्या पदावर विराजमान झाल्याने जिल्हावासीयांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मागील कालखंडात अनेकदा मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. पाटील यांचे नाव चर्चेत यायचे; मात्र या पदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. ती हुरहुर डॉ. पाटील घराण्याच्या हितचिंतकांच्या मनात होती. ती आज काही अंशी सुनेत्राताईंच्या निवडीने भरून निघाली आहे.
उपमुख्यमंत्रीपदावर मराठवाड्यातील यानिमित्ताने तिसऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे. पहिल्यांदा ही संधी बीडचे काँग्रेस नेते सुंदरराव सोळंके यांना १९७८ ते १९८० या काळात मिळाली. त्या वेळी शरद पवार मुख्यमंत्री, तर सोळंके उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर १९९५ ते १९९९ या काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी या पदाला न्याय दिला.
त्यानंतर सातत्याने उपमुख्यमंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राकडे अनेक वर्षे राहिले. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आदी नेत्यांनी हे पद भूषविले. आता सुनेत्राताई पश्चिम महाराष्ट्रातील असल्या, तरी माहेर म्हणून मराठवाड्यालाही या निमित्ताने मान मिळाला आहे.