

Sunetra Pawar takes oath as Deputy Chief Minister
मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (दि. ३१) सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शनिवारी संध्याकाळी लोकभवन येथे शपथविधी पार पडला. शपथविधीसाठी लोकभवनला येणाऱ्या समर्थकांनी फुले, पुष्पगुच्छ न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या शपथविधीला दु:खाची झालर असल्याने अत्यंत साधेपणाने शपथविधी पार पडला.
शुक्रवारी सकाळी अजित पवारांचे अस्थिविसर्जन होताच दुपारी बाराच्या सुमारास सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. या बैठकीत त्यांनी सुनेक्षा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला होकार दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विनंतीला सुनेत्रा पवारांनी संमती दिली.
शनिवारी दुपारी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनेत्रा पवारांच्या निवडीचे पत्र दिले. यानंतर संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडला.
शरद पवार यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याबाबत कोणतीही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. या शपथविधीला शरद पवार अनुपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी दुपारी काटेवाडीत आशाताई पवार (अजितदादांच्या मातोश्री) यांची भेट घेतली. 'मी काकूंना भेटायला आले होते. उद्या (रविवारी) केंद्रीय अर्थसंकल्प असल्याने मी इथून दिल्लीला रवाना होणार आहे', अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. शपथविधीबाबत मला कल्पना नाही, असं सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.निवडीचे पत्र दिले. संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडला.
अजित पवारांच्या जाण्याने अवघे पवार कुटुंब कोसळून गेले आहे. त्यांची दोन्ही मुले राजकारणात अजून नवखी असल्याने त्यांना पुढे करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना घ्यावा लागला आहे. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्यासाठी राजी करण्यात आले. अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवार या खंबीर वृत्तीच्या आहेत. बारामती मतदारसंघ आणि त्यांच्या संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत. तसेच, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर पुढे लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणत्याही निवडणुका नसल्या, तरी त्यांना पक्षाची घडी बसवून पक्षाला पुढे नेण्याचे काम करावे लागणार आहे. सोबतच, सरकारमध्येही आपला दबदबा ठेवावा लागणार आहे.