धाराशिव

धाराशीव: बेंबळी येथे मराठा आरक्षणासाठी तरुणाने पेटवली स्वत:ची दुचाकी

अविनाश सुतार

समुद्रवाणी:  धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकरी युवकाने स्वत:ची स्कुटी पेटवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आक्रोश व्यक्त केला. रविवारी (दि.१०) दुपारी अचानकच आंदोलनाला सुरुवात केल्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली.

बेंबळी येथील मराठा युवक पंकज महादेव बरडे याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आज दुपारी तीव्र संताप व्यक्त केला. त्याने आपली स्कुटी धाराशिव ते उजनी रस्त्यावर आणली. यावर पेट्रोल टाकून रस्त्यावरच त्याने स्कुटीला आग लावून दिली. यावेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या मराठा युवकांनी गगनभेदी घोषणाबाजी केली. एक मराठा, लाख मराठा या घोषनेसह युवकांनी सर्वच राजकीय पक्षातील मराठा नेत्यांना लक्ष्य बनवत त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या. सर्वच नेत्यांविरोधात तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात येत होता.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. कोणतीही माहिती न देता आंदोलन केल्यामुळे येथील पोलिसही गोंधळात पडले होते. ऐनवेळी घटनास्थळी पोलिसांनी येऊन मराठा युवकांना शांततेचे आवाहन केले. तसेच पेटती स्कुटी पाणी टाकून विझवण्यात आली. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास बेंबळी गावात कोठेही व कधीही तसेच कोणतीही माहिती न देता यापेक्षा जहाल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मराठा युवकांनी दिला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT