Dharashiv news 
धाराशिव

Dharashiv news: पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चार आरोपी ताब्यात; ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चोरीचे चार गुन्हे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

रत्नापूर : बाळासाहेब जाधवर पवनचक्कीच्या ठिकाणाहून कॉपर केबल, कॉपर रॉड, तार आदी साहित्य चोरणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून पवनचक्कीचे चोरीचे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पवनचक्की चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दि. ७ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, अनसुर्डी शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीच्या ठिकाणाहून चोरी करणारी टोळी दाट झाडीत थांबली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात वाहने थांबवून पायी झाडीत प्रवेश केला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची माहिती घेतली असता, त्यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पवनचक्की चोरीबाबत चौकशी केली असता नंदू रामा शिंदे, रा. खामकरवाडी याने खामकरवाडी येथे त्याच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी पवनचक्कीचे चोरीचे साहित्य ठेवले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खामकरवाडी येथे जाऊन कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार आदी साहित्य जप्त केले. या साहित्याबाबत अधिक तपास केला असता येरमाळा आणि वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवनचक्की चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी या प्रकरणात पवनचक्की चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले.

या प्रकरणी अनिल नाना काळे (वय ४०, रा. मस्सा), नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी), बबलू ऊर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९, रा. खामकरवाडी) आणि शाम ऊर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८, रा. खामकरवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके तसेच पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, पोलीस हवालदार महेबूब अरब, प्रकाश बोईनवाड आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT