मराठवाडा

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

अविनाश सुतार

तुळजापूर; सतीश महामुनी : तुळजाभवानी देवीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूर तीर्थक्षेत्र सहा लाख भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा चार राज्यांमधून भाविक तुळजापुरात दाखल झाले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता भाविकांना सुरळीत दर्शन घेता आले.

परंपरागत पद्धतीने आणि विधिवत तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाल्याचा धार्मिक विधी देवीचे भोपे पुजारी यांनी पूर्ण केला. भिंगार येथील मानाच्या पलंगावरून देवीची मूर्ती मुख्य गाभाऱ्यात चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. धार्मिक पद्धतीने पूजा आणि आरती संपन्न झाली. अडीच ते तीन च्या दरम्यान मध्यरात्री भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. धर्मदर्शन आणि मुखदर्शन दोन्ही रांगेतून पहाटेपर्यंत दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले.

सकाळी सात वाजता तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा सुरू झाली. त्यानंतर नित्य पूजा, नैवेद्य आणि आरती असे रोजचे विधी संपन्न झाले. दरम्यान, घाटशिल मार्गाने भाविकांना दर्शन मंडपात प्रवेश देण्यात आला आणि तेथून धर्मदर्शन आणि मुखदर्शनाच्या रांगा सुरू झाल्या. दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे ३ लाख भाविकांचे दर्शन झाले.

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी योग्य नियोजन केले होते. तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाच्या निमित्ताने विशेष सूचना दिल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुमारे 1,500 बसेसची सोय करण्यात आली होती. तर कर्नाटकातून 500 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. २ हजारपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. तुळजापूर येथील जुने बस स्थानक आणि नवीन बस स्थानक येथून पायी चालत येणार्‍या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आलेली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील उद्योगपती, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडून अन्नछत्र चालविण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT