मराठवाडा

Hingoli Lok Sabha Constituency: हिंगोली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस–ठाकरे गटात जुंपणार ?

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: हिंगोली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसने आपला दावा सांगत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने (ठाकरे गट) ही जागा आमचीच अन् आम्ही निवडूनही आणणार, असा दावा केला आहे. त्यामुळे या जागेवरून (Hingoli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघात (Hingoli Lok Sabha Constituency)  हिंगोली जिल्हयातील वसमत, कळमनुरी व हिंगोली या विधानसभा मतदार संघासह विदर्भातील उमरखेड (जि. यवतमाळ), तसेच किनवट, हदगाव (जि. नांदेड) या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघावर पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने (ठाकरे गट) हा मतदार संघ आपला बालेकिल्ला बनविला होता. मात्र, सन 2014 मध्ये मोदी लाटेतही या मतदार संघातून काँग्रेसचे दिवगंत खासदार राजीव सातव विजयी झाले होते. तर 2019 मध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (शिंदे गट) विजयी झाले. अन् हा मतदार संघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेला.

मात्र, खासदार पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. दरम्यान, आता महाविकास आघाडीतून हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरु झाले. त्यानुसार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सर्व अधिकार सुपूर्द करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. हिंगोली लोकसभेचे वातावरण काँग्रेससाठी पोषक असल्याचे सांगत त्यांनी या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा केला. त्यामुळे ही जागा काँग्रेसच लढविणार असे बोलले जात आहे.

मात्र, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते शिवसेनेचे (ठाकरे गट) अंबादास दानवे यांनी शुक्रवारी हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली येथे भेटी दिल्या. त्यानंतर हिंगोलीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी हिंगोलीची जागा ठाकरे गट लढविणार अन् जिंकणाच असा दावा केला आहे. दरम्यान, या जागेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस व ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत धूसफूस सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये या जागेवरून जुंपणार असल्याचे चित्र आहे. तर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT