Tembhapuri Medium Project : टेंभापुरी मध्यम प्रकल्पात मुरुम माफियांचा धुमाकूळ File Photo
छत्रपती संभाजीनगर

Tembhapuri Medium Project : टेंभापुरी मध्यम प्रकल्पात मुरुम माफियांचा धुमाकूळ

परिसरात जागोजागी खड्डे; तहसील, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

mafia in Tembhapuri medium project

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसराला वरदान ठरलेला टेंभापुरी मध्यम प्रकल्पात सध्या मुरूम माफियांनी धुमाकूळ घातला आहे. धरणातून रात्रंदिवस जेसीबी, पोकलेन, हायवाच्या सहाय्याने सर्रास मुरमाची वाहतूक सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते.

या सर्व प्रकाराकडे संबंधित पाटबंधारे विभाग, महसूल विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. सध्या मुरमी, दहेगाव बंगला, लिंबे जळगाव, टेंभापुरी भागात मोठ्या प्रमाणावर विविध उद्योग उभारल्या जात आहे. यासाठी मुरमाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

मुरमाला सोन्याचे भाव आले असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी काही मुरूम माफियांकडून पाटबंधारे विभागातील काही जणांना धरून शासनाचा मोठ्या प्रमाणावर कर बुडवून हा गोरख धंदा राजरोस सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. काही ठिकाणी उत्खननाची परवानगी नसतानाही परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती, दगड उत्खनन सुरू असून नागरिकांचे लक्ष असलेल्या तुरळक ठिकाणी शंभर दोनशे ब्रासची नाम मात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास उत्खनन केल्याचे चित्र आहे.

भरलेली रॉयल्टी व झालेले उत्खनन यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असून उत्खननाची एटीएस मशीनद्वारे मोजणी करून संबंधितावर दंडात्मक कार्यवाही करावी व गुन्हे दाखल करावे अशी ही मागणी होत आहे. गंगापूर तालुक्यातील सनव येथील शिवना नदीपात्रात ४ जूनं रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक उत्खननाच्या ठिकाणी भेट देऊन दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जी कारवाई केली त्याचप्रमाणे टेंभापुरी मध्यम प्रकल्पातही लक्ष घालण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.

मुरुमासाठी धरण रिकामे करण्याचा प्रकार

मुरूम भरण्यासाठी धरणातील पाणी सोडून धरण रिकामे करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. टेंभापुरी मध्यम प्रकल्प हा गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरला जात आहे. पाण्यामुळे या ठिकाणाहून मुरूम व माती काढण्यास अडचण येते. यावर्षी धरणातून मार्च महिन्यात मुरूम व माती उघडी करण्यासाठी दोन वेळेस पाण्याचा विसर्ग केला होता.

मुरूम माती काढणे शक्य नसल्याने खनिज माफियांच्या आशीर्वादाने हा अजब कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. तुरळक शेतकऱ्यांची मागणी आल्याचे दाखवत मुरूम काढण्याच्या ठिकाणची धरणातील जमीन उघडी होईपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करत धरणातील जमीन उघडी करण्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहे.

टेंभापुरी मध्यम प्रकल्पामधून मुरूम व माती वाहतूक चालू असल्याचे मला समजल्यावर मी त्या ठिकाणी अचानक भेट दिली परंतु तेथे वाहतूक करणारी वाहने आढळले नाही, मुरूम वाहतूक या कंपनीत झाला आहे त्यांच्यावर कार्यवाही करणार.
- नवनाथ वगवाड, तहसीलदार गंगापूर.
कालवा क्षेत्रातून मुरूम व माती वाहतूक चालू आहे. याबाबत आम्ही तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे. संबंधित तहसील कार्यालयाने कारवाई करावी. कारवाई करण्याचे आम्हाला अधिकार नाहीत.
- पी. टी. कवले, उप अभियंता, नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग, गंगापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT