Chhatrapati Sambhajinagar News : इंग्रजी शाळांचे विद्यार्थी वळले मराठी शाळांकडे
Students of English schools turned to Marathi schools
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात खासगी इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढल्यामुळे मराठी माध्यमातील जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी संख्या घटताना दिसत होती. मात्र यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी तब्बल २०,३४२ नव्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने शाळांना सोन्याचे दिवस आले आहते. यामध्ये अनेक इंग्रजी शाळांतील मुलांचा समावेश आहे, हे विशेष.
शिक्षण विभागाचे अधिकारी, जि.प.चे शिक्षक जोरदार प्रयत्न करीत असल्यामुळे प्रवेशात काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुट्यानंतर १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ३० जूनपर्यंत प्रवेश प्रकीया चालणार आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अजून प्रवेश वाढणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिंडी, बैलगाड्या, रथातून मिरवणुका काढत नवप्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमध्ये जास्तीत-जास्त मुलांनी प्रवेश करावा व जे विद्यार्थी आहेत. त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे भर
जिल्हा परिषद शाळांमध्ये आता स्मार्ट क्लास, संगणक शिक्षण, बालविज्ञान परिषद, वाचन संस्कार, आणि क्रीडाप्रशिक्षण अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शालेय शिक्षण योजनांमुळेही शाळा केवळ नावापुरती नव्हे, तर गुणवत्त ोच्या बाबतीतही सक्षम बनली असल्यानेही मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे.
शिक्षकांची सोशल मीडियावर जनजागृती
दरम्यान शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक शाळांतील शिक्षकांनी सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती करून जनजागृती करण्याचे काम केलेले आहे. त्याशिवाय प्रवेश-ोत्सुक विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन ही मुले आपल्या शाळेत आली पाहिजेत. यासाठीही प्रयत्न करण्यात आलेत.

