सुमित पवार
छत्रपती संभाजीनगर : केवळ ७ महिन्यांच्या हरसूल येथील चिमुकल्या बालकाने चुकून Foreign Body गिळल्याने त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. बालकावर विविध विभागांच्या तज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून उपचार करण्यात आले. बालरोग व शल्यचिकित्सा विभागांमधील समन्वयपूर्वक उपचारामुळे प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुखरूप घरी सोडण्यात आले.
प्राथमिक तपासणीत foreign body अन्ननलिकेत असल्याचा संशय होता. सुरुवातीस आवश्यक तपासण्या व एक्स रे केल्यानंतर ब्रॉन्कोस्कोपी व इसोफॅगोस्कोपी करण्यात आली. त्या दोन्ही तपासांमध्ये foreign body न मिळाल्यामुळे रुग्णाचा पोटाचा व आतड्याचा सी टी स्कॅन करण्यात आला. त्यात ती foreign body एक काचेचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले. ती foreign body नंतर शल्यचिकित्सा विभागाकडून काढण्यात आली. सतत निरीक्षण, तज्ज्ञ वैद्यकीय उपचार व काळजीपूर्वक व्यवस्थापनामुळे कोणतीही गंभीर गुंतागुंत न होता बालकाची प्रकृती सुधारली आणि अखेर त्याला सुरक्षितरीत्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
हा यशस्वी उपचार मा डॉ शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे, पथक प्रमुख डॉ. शिल्पा पवार, डॉ. सोनाली पुऱ्हे आणि डॉ. अंजली पवार,डॉ प्रशांत, डॉ स्वनिक, गौरव, डॉ शर्मिन डॉ शिधांत तसेच शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव डॉ आरिफ काझी, डॉ अमोल, डॉ शाम , डॉ आकांक्षा व त्यांचे पथक यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. बालरोग विभाग, शल्यचिकित्सा विभाग व PICU मधील डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका , चिमुकल्याचे पालक आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालकाचे प्राण वाचविणे शक्य झाले.
पालकांसाठी महत्त्वाचा इशारा
तज्ज्ञ डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांच्या आवाक्यात काचेच्या वस्तू, नाणी, बॅटरी, मणी, चुंबक, पिन, खेळण्यांचे छोटे भाग किंवा इतर लहान वस्तू ठेवू नयेत. अशा वस्तू गिळल्यास किंवा श्वसनमार्गात गेल्यास जीवघेणा प्रसंग उद्भवू शकतो. मुलाने अशी कोणतीही वस्तू गिळल्याचा संशय आल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही डॉक्टरांनी सांगितले.
पालकांनी व्यक्त केली कृतज्ञतेची भावना
"वेळीच निदान, तज्ज्ञांचे समन्वित उपचार आणि रुग्णालयातील सातत्यपूर्ण देखरेख यामुळे एका निरागस बालकाचे प्राण वाचले," अशी भावना उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने सांगितले. तसेच "घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत योग्य उपचार करून आमच्या बाळाचे प्राण वाचवले. सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो'' अशी कृतज्ञतेची भावना चिमुकल्याचा पालकांनी व्यक्त केली.