

Sambhajinagar News: Life saved for low birth weight newborn in the Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कमी वजनाच्या आणि अपूर्ण दिवसांत जन्मलेल्या नवजात शिशूला जन्मतः गंभीर श्वसनविकार, संसर्गजन्य गुंतागुंत तसेच हृदय व फुफ्फुसांशी संबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. घाटीतील बालरोग विभागाच्या नवजात अतिदक्षता विभागात सलग ८१ दिवस उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने या चिमुकल्यास घरी पाठविण्यात आले. याप्रसंगी पालकांसह विभागातील डॉक्टर्स, परिचारिकांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि हास्य उमटले.
या बालकास २५ फेब्रुवारी २०२६ घाटीतील नवजात अतिदक्षता विभागात अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बालकाला तब्बल ५९ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. बालरोग विभागाच्या वैद्यकीय पथकाने सातत्यपूर्ण व समन्वित प्रयत्नांद्वारे बालकाची प्रकृती सुधारण्यात यश मिळविले. नुकतेच १६ मे रोजी, म्हणजेच ८१ दिवसांच्या प्रदीर्घ उपचारानंतर त्यास सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि विभाग प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्मिता बजाज, डॉ. श्रीकांत जोशी, डॉ. स्नेहल सोनुळे, डॉ. मंजुनाथ, डॉ. लुंबिनी, डॉ. सिमरा, डॉ. स्वानिक, डॉ. योगेश, डॉ. भावना, डॉ. युवराज आणि डॉ. शुभम यांनी मोलाची भूमिका बजावली. परिसेविका वंदना गिरे, बालरुग्ण परिसेविका जयश्री जाधव, वॉर्ड २४ मधील सिस्टर्स, ब्रदर्स तसेच इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची अहोरात्र रुग्णसेवा आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे आव्हानात्मक उपचार यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले.