

A tumor the size of a 22-week-old uterus was removed from a woman's abdomen
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा येथून आलेल्या एका ४० वर्षीय महिलेवर जिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात बुधवारी (दि.८) अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून तब्बल १२×१५×१५ सेंमी आणि २२ ते २४ आठवड्यांच्या गर्भाशयाच्या आकाराची मोठी गाठ (फायब्रॉईड) यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेला तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि अवाजवी रक्तस्रावाचा त्रास सुरू होता. जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीत त्यांना एयूबीएलचे निदान झाले. त्यांच्या गर्भाशयात दोन मोठ्या गाठी होत्या, ज्यामुळे गर्भाशयाचा आकार २२ ते २४ आठवड्यांच्या गरोदरपणासारखा झाला होता. रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड होती.
मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती विभागातील डॉ. स्मिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मणियार आणि डॉ. अमारा यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. चव्हाण, डॉ. वासुकर आणि डॉ. प्रवीण यांच्या टीमने रुग्णाला कुशलतेने भूल दिली. सिस्टर आरती मुंडे यांनी ओ.टी. स्टाफ म्हणून सहकार्य केले. यशस्वी उपचारामुळे रुग्ण व नातेवाइकांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले आहेत.