Chhatrapati Sambhajinagar Khavadya Hill Tragedy: खवड्या डोंगरावर घडलेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेनंतर 18 वर्षीय कुणाल चांदवडे याने आयफोनसाठीच्या हट्टामुळे किंवा आयफोनच्या ईएमआयच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि परिसरात सुरू झाली होती. मात्र, या चर्चांवर आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
पोलिसांनी सध्या तरी आयफोनमुळेच कुणालने आत्महत्येचा प्रयत्न केला, असे निश्चितपणे म्हणता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. घटनेला अजून 24 तास पूर्ण झालेले नसल्याने प्राथमिक तपासाच्या आधारावर आत्महत्येमागचं नेमकं कारण सांगणं योग्य ठरणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
खवड्या डोंगरावरून पडून 18 वर्षीय कुणाल चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, कुणालने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले असता तेही डोंगरकड्यावरून खाली पडले.
बाप-लेकाला खाली पडताना पाहून आईनेही टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाला होता, तसेच आयफोनसाठीचा हट्ट किंवा त्याच्या ईएमआयमुळे कुणाल तणावात होता, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, पोलिसांनी या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले की, या घटनेला अजून 24 तासही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे केवळ प्राथमिक तपासावरून आयफोनमुळेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असे खात्रीने सांगता येणार नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल काही कारणांमुळे तणावात असल्याचं दिसून येत होतं. मात्र, त्याच्या तणावामागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे.
कुणालला समजावण्याचे आणि वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. त्याला नेमकी कोणती अडचण आहे, हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जात होता. ग्रामस्थ आणि पोलिसांनीही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं आहे.
मात्र, ही घटना अत्यंत वेगाने घडल्याने मोठी दुर्घटना टाळता आली नाही. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
सध्या या घटनेमागे नेमकं कोणतं कारण होतं, याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी पोलिसांनी कोणत्याही एका कारणावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. आयफोन, ईएमआय, कौटुंबिक वाद किंवा इतर कोणत्या कारणामुळे कुणाल तणावात होता, याचा तपास सुरू आहे.
पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागचं खरं कारण स्पष्ट होईल. त्यामुळे अफवा आणि अपुऱ्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढू नयेत, असं पोलिसांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट होत आहे.