

Sugar Price Rise: साखरेच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. स्वयंपाकघरापासून चहाच्या टपऱ्यांपर्यंत साखरेच्या दरवाढीचा परिणाम दिसू लागला आहे. अवघ्या काही दिवसांत साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, सणासुदीचा काळ जवळ येत असताना चहा, मिठाई, कोल्ड ड्रिंक आणि साखरेपासून बनणाऱ्या इतर वस्तू महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुमारे दीड महिन्यापूर्वी साखरेचा घाऊक दर प्रतिकिलो 42 ते 45 रुपयांच्या आसपास होता. मात्र आता काही बाजारांत हा दर 62 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात काही ठिकाणी साखरेसाठी प्रतिकिलो 65 रुपये मोजावे लागत आहेत.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 20 जुलै रोजी साखरेचा सरासरी किरकोळ दर प्रतिकिलो 48.18 रुपये होता. मात्र 21 ऑगस्टपर्यंत तो वाढून 58.20 रुपये प्रतिकिलो झाला. म्हणजेच अवघ्या महिन्याभरात साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
काही बाजारांमध्ये ही वाढ आणखी जास्त आहे. हरियाणातील काही भागांत साखरेचा दर 62 ते 65 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
सरकारने साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे दिली आहेत. देशांतर्गत उत्पादनात घट, सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी, पिकांचे झालेले नुकसान आणि साठेबाजी यामुळे किमतींवर दबाव वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
साखरेच्या दरवाढीचा परिणाम आता थेट ग्राहकांवर होऊ लागला आहे. वाढत्या खर्चामुळे काही ठिकाणी चहाचे दरही वाढले आहेत. सोनीपतमधील एका चहा विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी 10 रुपयांना मिळणारा चहा आता 15 रुपयांना विकावा लागत आहे.
मिठाई व्यावसायिकांसमोरही खर्चाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. साखरेसोबतच पीठ, वनस्पती तूप आणि देशी तुपाच्या किमती वाढल्याने मिठाईचे दर प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांनी वाढवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मिठाई खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
साखरेचा वापर केवळ चहा आणि मिठाईसाठी होत नाही. कोल्ड ड्रिंक, बिस्किटे, विविध खाद्यपदार्थ आणि औषधनिर्मिती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते. त्यामुळे साखर सातत्याने महाग होत राहिल्यास या उत्पादनांच्या कंपन्यांच्या खर्चातही वाढ होऊ शकते.
हा वाढलेला खर्च कंपन्या ग्राहकांवर टाकतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत साखरेवर आधारित अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदाच्या हंगामात देशातील साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला सुमारे 343 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. मात्र आता उत्पादन सुमारे 306 लाख मेट्रिक टनांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऊस पिकावर रेड रॉट (लाल कुज - बुरशीजन्य रोग) आणि टॉप बोरर (शेंडा पोखरणारी अळी) यांसारख्या रोगांचा परिणाम झाला. त्यातच अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
सोनीपत येथील एका साखर कारखान्याच्या आकडेवारीतही उत्पादनातील घट दिसून येते. 2022-23 मध्ये या कारखान्यात 30.75 लाख क्विंटल उसाचे गाळप झाले होते. 2025-26 मध्ये ते कमी होऊन 20.39 लाख क्विंटलांवर आले. याच काळात साखरेचे उत्पादनही 3.08 लाख क्विंटलांवरून 1.90 लाख क्विंटलांपर्यंत घसरले आहे.