

sambhajinagar son father and mother death falling from Mountain
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खवड्या डोंगराच्या कड्यावर उभा असलेला १८ वर्षांचा कुणाल खाली उडी मारण्याच्या तयारीत होता. 'आईसाठी तरी जग ना रे... दुसरं सोल्युशन नाहीये का?', अशी भावनिक साद घालत पोलिस आणि नागरिकांनी सलग दोन तास त्याची मनधरणी केली. पण तो ऐकण्याच्या मनः स्थितीत नव्हता. अखेर एकुलत्या एक लेकाला वाचवण्यासाठी बापाने जिवाच्या आकांताने पुढे झेप घेतली.
मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. मुलाला वाचवण्याच्या झटापटीत बाप-लेक सुमारे अडीचशे फूट खोल दरीत खडकावर कोसळले. आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि पोटचा गोळा दरीत बेपत्ता झाल्याचे पाहून सुन्न झालेल्या आईनेही क्षणाचाही विचार न करता त्यांच्या मागोमाग मृत्यूच्या दरीत उडी घेतली आणि अवघ्या काही सेकंदांत चांदगुडे कुटुंबाचा संसार कायमचा उद्ध्वस्त झाला. या घटनेतील सर्वात काळजाचा ठोका चुकवणारा योगायोग म्हणजे, वर्षभरापूर्वी कुणाल याच कड्यावरून मृत्यूच्या दाढेतून परतला होता.
वर्षभरापूर्वी वाचला, पण यावेळी काळाचा घाला!
कुणालने नेमक्या याच ठिकाणी आणि याच कड्यावरून मागील वर्षीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी चिकलठाणा पोलिस, पदमपुरा अग्निशमन दल आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत संयुक्त बचावमोहीम राबवली आणि त्याला सुखरूप खाली उतरवले होते. दुर्दैव असे की, गेल्या वर्षी कुणालला जीवनदान देणाऱ्या त्या बचाव पथकात सहभागी असलेले पोलिस अंमलदार सुरेश भिसे हे शुक्रवारीही त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी यावेळीही त्याला परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण वर्षभरापूर्वी वाचलेल्या कुणालला यावेळी मात्र काळाने गाठलेच.
आठ वर्षापूर्वी गमावला होता मोठा मुलगा
मुरलीधर चांदगुडे हे पंधरा वर्षांपूर्वी कुटुंबासह शहरात आले होते. ट्रक चालवून ते संसाराचा गाडा हाकत. आठ वर्षांपूर्वीच त्यांच्या मोठ्या मुलाचे आजाराने निधन झाले होते. त्यानंतर कुणाल हाच त्यांचा एकुलता एक आधार होता. सर्वांचा त्याच्यावर प्रचंड जीव होता. कुणाल अभ्यासातही अत्यंत हुशार होता. तो दहावीत शाळेतून दुसरा आला होता आणि सध्या डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून 'नीट'ची तयारी करत होता. मात्र, क्षुल्लक घरगुती वादातून आणि एका क्षणाच्या रागापायी कुटुंबाची सर्व स्वप्ने दरीत कोसळून चक्काचूर झाली.
अग्निशमन दलाची 'ती' जाळी ठरली अपुरी
सकाळी साडेदहा वाजता कुणाल डोंगरावर चढल्याची माहिती मिळताच ११ वाजता डायल ११२ चे पोलिस कर्मचारी दाखल झाले. दुपारी १२ च्या सुमारास अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. जवानांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेली झुडपे साफ करून तिथे मोठी जाळी लावली होती. कुणाल पडलाच, तर तो जाळीत अडकून त्याचा जीव वाचेल, अशी आशा होती. मात्र, जेव्हा कुणाल, त्याचे वडील आणि नंतर आई खाली कोसळले, तेव्हा ते तिघेही जाळीपासून दूर अंतरावर जाऊन थेट दगडांवर आदळले आणि जागीच गतप्राण झाले.
खवड्या डोंगर बनतोय 'सुसाईड पॉइंट'
शहरालगत सोलापूर-धुळे महामार्गावर, तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर आता आत्महत्येचे ठिकाण (सुसाईड पॉइंट) म्हणून कुप्रसिद्ध होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत याच डोंगरावरून उडी मारून १० ते १२ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अवैध उत्खननामुळे भूमाफियांनी डोंगराचा चोहोबाजूचा भाग अक्षरशः पोखरून काढलेला आहे. त्यामुळे या डोंगराचा माथा तब्बल ३०० फुटांपेक्षा अधिक उंच आणि अत्यंत धोकादायक बनला आहे. तिथे जाण्यासाठी एक पाऊलवाटही तयार झाली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वारंवार घडणाऱ्या या दुर्दैवी घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात आता मोठी भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या धोकादायक ठिकाणाला तत्काळ सुरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे.