

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सध्या जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख सराफा बाजारांसह दिल्लीच्या बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली आहे. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 5,500 रुपयांची वाढ झाली असून चांदी तब्बल 15,000 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, दिल्लीच्या स्पॉट मार्केटमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 1,200 रुपयांनी वाढून 10 ग्रॅममागे 1,63,500 रुपयांवर पोहोचला. मागील व्यवहार सत्रात सोन्याचा दर 1,62,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही जबरदस्त तेजी दिसून आली. शुक्रवारी चांदीचा भाव एकाच दिवसात 5,000 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 2,50,000 रुपयांवर पोहोचला. हा चांदीचा सुमारे 15 आठवड्यांतील उच्चांक मानला जात आहे.
याआधी गुरुवारी चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची वाढ झाली होती आणि भाव 2,45,000 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. अशा प्रकारे केवळ दोन व्यवहार सत्रांत चांदी 15,000 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी 4 मे रोजी चांदीचा भाव या पातळीच्या आसपास होता.
सोन्या-चांदीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने मौल्यवान धातूंना आधार मिळाला आहे. डॉलरची किंमत कमी झाल्यास इतर चलनातील गुंतवणूकदारांसाठी सोनं तुलनेने आकर्षक ठरू शकते.
याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा वेळी अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीतून पैसा काढून सोन्याकडे वळतात. सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जात असल्याने त्याची मागणी वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरमधील घसरण आणि अमेरिकन बाँडवरील परताव्यात झालेली घट यामुळेही सोन्या-चांदीला मोठा आधार मिळत आहे. गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली खरेदी आणि चलन तसेच बाँड बाजारातील वाढती अस्थिरता यामुळे या दोन्ही धातूंचे दर वाढत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती वाढताना दिसल्या. शुक्रवारी स्पॉट गोल्डच्या दरात सुमारे 2 टक्क्यांची वाढ होऊन तो 4,600.91 डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचला. तर चांदीचा भाव जवळपास 3 टक्क्यांनी वाढून 69.87 डॉलर प्रति औंसवर पोहचला.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याची तेजी सलग तिसऱ्या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, जागतिक राजकीय परिस्थिती, डॉलरची हालचाल, अमेरिकन बाँड यिल्ड आणि गुंतवणूकदारांचा कल यावर पुढील दरवाढ अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, केवळ 48 तासांत सोनं 5,500 रुपयांनी आणि चांदी 15,000 रुपयांनी महागल्याने, सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. आगामी काळात ही तेजी कायम राहते की दरात काहीसा दिलासा मिळतो, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.