वैष्णवी निळ हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी वाळुज पोलिसांनी अवघ्या चार तासांत संशयित आरोपीस जेरबंद केले  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | मैत्री अन् वाद; विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; ठोस धागेदोरे नसताना वाळुज पोलिसांची 4 तासांत आरोपीस अटक

कोणताही ठोस पुरावा नसतानाही अल्पावधीत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश, संशयित आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar student murder case

गंगापूर : वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमी येथे १७ वर्षीय वैष्णवी संतोष निळ हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी वाळुज पोलिसांनी अवघ्या चार तासांत संशयित आरोपीस जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. न्यायालयाने आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वैष्णवी व आरोपी यांच्यातील मैत्री आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. कोणताही ठोस पुरावा नसतानाही अल्पावधीत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले, हे विशेष.

नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वैष्णवी वाळुज येथील साईनाथ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. ती सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत कॉलेजला जात असे. वैष्णवी वडील संतोष, आई मथुरा, आजोबा यादवरा व लहान भावासह राहत होती. निळ दाम्पत्य बटाईने शेती करत असून संतोष हे इसारवाडी रोडवरील एच.पी. पेट्रोलपंपाजवळ पानटपरी चालवितात.

शुक्रवारी वैष्णवी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहाला कॉलेजसाठी घराबाहेर पडली. दुपारी कॉलेजमधून घरी आल्यानंतर ती घरात एकटीच होती. हीच संधी साधून आरोपीने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेच्या वेळी वडील पानटपरीवर, लहान भाऊ शाळेत तर आई मथुरा शेतात कामासाठी गेलेली होती.

मैत्रीनंतर वाद, अन्‌ टोकाची पायरी

सूत्रांच्या माहितीनुसार, वैष्णवी व नानासाहेब यांच्यात पूर्वी मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी नानासाहेबचे लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. घटनेच्या दिवशीही वाद झाल्यानंतर आरोपीने टोकाची पायरी उचलल्याचे तपासात समोर आले आहे.

दुपारी वैष्णवीचे वडील घरी आल्यानंतर ती खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तात्काळ पत्नीला शेतातून बोलावून घेतले. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वाळुज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक व श्वान पथक पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार, पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पहाटे बोलेगावातून अटक

हत्या करून आरोपी फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी तपास पथकाला तातडीच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे व विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत बोलेगाव (ता. गंगापूर) येथून आरोपीस २० डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्यासह पथकातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस मित्रांनी यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT