

छत्रपती संभाजीनगर :हर्सल ठाण्याच्या हद्दीतील ओहर गावात जमिनीच्या वादातून ११ जणांच्या टोळक्याने मृत दादा पठाण रॉड, दांड्याने हल्ला चढवून माजी सरपंच दादा सांडू पठाण (६८) यांची निघृण हत्या केली. तर कुटुंबातील इतर तीन सदस्य हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही थरारक घटना बुधवारी (दि.१७) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण होऊन मृत कुटुंबीयांच्या संतप्त नातेवाइकांनी आरोपींच्या दुकानांची तोडफोड केली.
इम्रान खान मोईन खान पठाण आणि उमेर खान जमीर खान पठाण (२८) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित ९ आरोपी पसार झाले आहेत. अधिक माहिती अशी की, ओहर गावातील गट क्रमांक १९८ मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंबांत २०२२ पासून वाद सुरू आहेत.
मृत दादा पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा असून, महसूल दप्तरी नोंदही आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास किरकोळ कारणावरून आरोपींनी पठाण कुटुंबाशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि ११ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने पठाण कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने दादा सांडू पठाण यांचा मृत्यू, झाला. तर माजेद मोईन पठाण, जुनैद पठाण आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी गावातून पसार झाले. याप्रकरणी मृत दादा पठाण यांचा मुलगा आसिफ (३३) यांच्या तक्रारीवरून हसूल पोलिस ठाण्यात ११ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावात तणाव, पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच हर्सल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यापाठोपाठ गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पगारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सध्या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. गुन्हे शाखेचे पीएसआय प्रवीण वाघ, पीएसआय गणेश केदार यांनी आरोपींची धरपकड सुरू केली होती.
मुलगा तक्रार देण्यासाठी जाताच हल्ला
दादा पठाण शेतातून येऊन घराजवळ पोहोचताच आरोपींनी हल्ला केला. मदतीला कोणी येऊ नये म्हणून त्यांच्या घराच्या गेटला बाहेरून कडी लावून घेतली होती. त्यांचा मुलगा आसिफ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला असतानाच इकडे वडिलांचा आरोपींनी जीव घेतला.
तीन गंभीर गुन्ह्यातील आरोपी
टोळक्यातील काही जण गंभीर गुन्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत. यामध्ये समीर खानने हर्सल पोलिसांसमोर तलवारी नाचवल्या होत्या. मोईन खानवर जमीन हडपण्याचे अनेक गुन्हे आहेत तर अक्रम पठाण (आरोपी अफरोजचा भाऊ) हा एका खुनाच्या गुन्ह्यात हसूल कारागृहात आहे.
पोलिसांचा निष्काळजीपणा जीवावर बेतला ?
डिसेंबर २०२२ मध्ये जमिनीचा वाद उफाळून आल्यानंतर दादा पठाण यांनी आरोपी गुन्हेगारी पार्शवभूमीचे असल्याने सांगून माझा खून करतील, अशी भीती व्यक्त करून तशी तक्रार पोलिस आयुक्तांकडे निवेदन देऊन केली होती. अखेर बुधवारी १७ डिसेंबरला घात झालाच, दादा पठाण यांनी तत्कालीन हर्मूल पोलिस अधिकारी व कर्मचारी आरोपींना मदत करत असल्याचा आरोपही केला होता. तसे अर्जही त्यांनी पोलिसांना दिले होते. वेळीच पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
प्लिज भैया मत मारो, बस करो
दादा पठाण यांना घराच्या गेटसमोर ११ जणांचे टोळके रॉड, दांड्याने जबर मारहाण करत होते. कुटुंबातील महिलांनी शिवीगाळ, लाठ्या काठ्याने मारहाणीचा आवाज ऐकून गेटकडे धाव घेतली. मात्र आरोपींनी गेट बाहेरून लावून घेतला होता. महिला भैया प्लिज मत मारो, बस करो, हो गया ना भैया अशी विनवणी करत होत्या. मात्र आरोपींनी दादा पठाण यांना एवढे मारले की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फरार झालेले आरोपी
या हल्यात फरार झालेले आरोपी जमीर इनायतखान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान पठाण (४२), असलम उर्फ गुड्डू खान गयाज खान पठाण (४०), हैदर खान गयाज खान पठाण (४२), समीर खान जमीर खान पठाण (३५), फुरकान खान अजगर खान पठाण, रामवतार सगरमल साबू, मोईन इनायतखान पठाण.