

छत्रपती संभाजीनगर : कुख्यात गुन्हेगार रितेश कुन्हाडे ऊर्फ कांचा याने एका साथीदारासोबत बंबाटनगर येथून दुचाकीची चोरी केली. तिचा शोध घेत निघालेल्या दोघांना दुचाकी दिसल्याने त्यांनी जाब विचारताच त्यांच्यावर मी डॉन आहे म्हणत स्कुडायव्हरने हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.१६) सकाळी आठच्या सुमारास विश्रांतीनगर भागात घडली.
फिर्यादी अमोल अशोक रुडे (३९, रा. बंबाटनगर) यांच्या तक्रारीनुसार, ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी आठ वाजता ड्यूटीवरून घरी आले. तेव्हा गल्लीतील लोकांनी रात्री चोर आले होते आणि त्यांनी तुमचे भाडेकरू प्रकाश चव्हाण यांची दुचाकी चोरून नेली आहे, अशी माहिती दिली.
त्यामुळे रुडे आणि चव्हाण दोघेही दुचाकी शोधत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे निघाले. विश्रांतीनगर येथे चव्हाण यांची दुचाकी उभी दिसली. तिथे आरोपी रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा आणि त्याचा साथीदार दुचाकीजवळ उभे होते. त्यांना ही दुचाकी माझी असून, कोणी आणली, असे चव्हाण यांनी विचारले. तेव्हा कांचाने मी डॉन आहे म्हणत चव्हाण यांना मारहाण सुरू केली.
रुडे मध्यस्थीसाठी जाताच त्यांच्या हातावर ने कांचाने मारून जखमी केले. गोंधळ पाहून लोक जमा होताच दोघेही मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे पळून गेले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा धाक नसल्याने गुंडगिरी
कुख्यात रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा याने मे महिन्यात मुकुंदवाडी रेल-वेस्टेशन भागात असाच धुडघूस घातला होता. तलवारबाजी करत चार रिक्षांच्या काचा फोडल्या होत्या. एका रिक्षाचालकाच्या मानेवर वार केला होता. तलवारीने मुंडके उडविण्याची धमकी दिली होती. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र त्यानंतरही स्थानिक पोलिसांचा धाक नसल्याने कांचाची गुंडगिरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.