छत्रपती संभाजीनगर

छ.संभाजीनगर: सासूरवाडीला जाताना भीषण अपघात; दोन साडूंचा जागीच मृत्यू

अविनाश सुतार

कन्नड, पुढारी वृत्तसेवा: शहरातील कन्नड -पिशोर रोडवरील एका पंपासमोर एका भरधाव कारने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २८) दुपारी साडेचारच्या सुमास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दगडू आबाजी ठाकरे (वय ३२, रा. भादली, ता. वैजापूर) मुगल विठ्ठल सोनवणे (वय ३८, रा. तांदुळवाडी, ता. कन्नड) हे दोघे सख्खे साडू कन्नड तालुक्यातील गारगोटी तांडा येथे सासुरवाडीला (एम.एच.२० बी. डब्ल्यू ९२१८) दुचाकीवरुन चालले होते. शहरातील पिशोर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ येताच पिशोरहुन कन्नड कडे भरधाव येणाऱ्या (एम.एच.२१ बी. एफ. ५६२९) कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात दगडू ठाकरे, मुगल सोनवणे यांचा जागीच मुत्यू झाला.

ही धडक इतकी जोराची होती की, कारच्या दोन्ही एअर बॅग फुटल्या. घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांना त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. शहर पोलीस ठाण्यात कार चालक पंकज करोटे (रा. कन्नड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासुरवाडीच्या नातेवाईकांचा आक्रोश

अपघातस्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर दगडू ठाकरे आणि मुगल सोनवणे यांची सासुरवाडी आहे. अपघातात दोन्ही जावई ठार झाल्याने नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. साडूंच्या दुर्दैवी निधनावर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT