गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर येथे बोगस कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे बोगस कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी आकाश आप्पासाहेब सुकाशे (रा. संजरपूर, ता. गंगापूर) याला ताब्यात घेतले आहे.
आकाश याची चौकशी केली असता सापडलेली बोगस पाकीटे गंगापूर शहरातील भूषण रामेश्वर पाटील यांच्या सद्गुरु ॲग्रो ॲन्ड मशीनरी या दुकानातुन आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दुकानात जावून पथकाने पाहणी केली व चौकशी केली. त्यानंतर दुकानदार भूषण व संशयित आरोपी आकाश सुकाशे या दोघांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली.
विभागीय कृषी सहसंचालक काळूशे, तालुका कृषी अधिकारी बापुराव जायभाये व कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ६ जूनरोजी ही कारवाई केली. बनावट कापूस बियाण्याची विक्री तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा