छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केला. धक्कादायक म्हणजे, नारेगावमध्ये भररस्त्यावर ४ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खून केल्यानंतर आरोपीने काही वेळ रस्त्यावरच गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज खान कलीम खान (वय ४९, रा. गल्ली क्र. १०, बिस्मिला कॉलनी, नारेगाव) असे मृताचे तर, कलीम शहा मदार शहा (वय ३६, रा. कैसर पार्क, नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, मृत फिरोज यांचा भाऊ मुजम्मिल कलीम खान (वय ३९) हे फिर्यादी आहेत. मुजम्मिल हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. ते आई-वडील, पत्नी, मुलांसह राहतात. त्यांना तीन भाऊ व दोन बहिणी आहेत. ४ जूनला सायंकाळी मुजम्मिल हे घरी बसून निवडणूक निकाल पाहात होते. तेवढ्यात जावेद कडू पटेल (वय ४०) यांचा मुजम्मिल यांना फोन आला. त्यांनी असरा टी हॉटेलजवळ फिरोज खान यांना कलीम शहा याने चाकू मारल्याची माहिती दिली. मुजम्मिल हे तत्काळ तेथे गेले. तेव्हा बरीच गर्दी जमलेली होती.
त्यांनी अधिक माहिती घेतली असता फिरोज यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. ते तत्काळ खासगी रुग्णालयात गेले. तेथे गेल्यावर माहिती समाजली की, कलीम शहा याने फिरोज यांना दारूसाठी पैसे मागितले होते. फिरोज यांनी नकार देताच त्याने छातीत चाकू खुपसला. काही कळण्याच्या आत त्याने हा चाकूहल्ला केल्याचे समजले. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून ६ वाजता फिरोज खान यांना मृत घोषित केले.
फिरोज खान यांच्यावर चाकूहल्ला करताना आरोपीने तेथे बराच गोंधळ घातला. यात त्यालाही जखम झाली आहे. ही माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक हिवराळे, उपनिरीक्षक लाटे हे पथकासह तेथे दाखल झाले. त्यांनी जखमी आरोपीला तत्काळ ताब्यात घेत उपचारासाठी घाटीत दाखल केले. तेथे तो नजरकैदेत आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक निरीक्षक हिवराळे करीत आहेत.
हेही वाचा