विहामंडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथील टाकळी पुलाजवळ श्यामचा मृतदेह ताब्यात घेताना पोलीस कर्मचारी Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan Crime | तिसऱ्या दिवशी चिमुकल्या श्यामचा मृतदेह कालव्यात तरंगताना सापडला

नांदर (ता. पैठण) येथील दोन निरागस भावंडांचा करुण अंत, गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Paithan Jayakwadi Canal Boy Body Found

पाचोड: नांदर (ता. पैठण) गावावर गेल्या तीन दिवसांपासून दुःखाचे काळे ढग दाटले आहेत. गावातील प्रत्येक घरात एकच चर्चा, एकच प्रश्न... एवढी निरागस, फुलांसारखी दोन मुलं असं अचानक कशी निघून गेली? दोन चिमुकल्या भावंडांच्या बेपत्ता होण्याने गाव हादरले होते. त्यातच आता दुसऱ्या चिमुकल्याचाही मृतदेह सापडल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. गावात चूल पेटली नाही, अंगणात मुलांचा खेळ नाही, फक्त शांतता आणि हुंदके...

आयुष उर्फ आर्यन सोमनाथ रोडगे (वय ७) याचा मृतदेह बुधवारी (ता. १८) सकाळी ९ वाजता डाव्या कालव्यात सापडला होता. दोन दिवसांपासून जिवाच्या आकांताने शोध सुरू होता. "माझं बाळ कुठं असेल, भुकेलं असेल, घाबरलं असेल" म्हणून आईची तगमग सुरू होती. पण नियतीने वेगळाच घाव घातला. आयुषचा मृतदेह सापडल्याची बातमी गावात पसरताच आईने फोडलेला आक्रोश आसमंतात घुमला. त्याच दिवशी सायंकाळी पावणेसात वाजता पोलिस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तोच गुरुवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता विहामंडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथे टाकळी पुलाजवळ दुसरा चिमुकला श्याम याचा मृतदेह पाण्यात तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. "देवाने तरी एवढं निर्दयी कसं व्हावं?" असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता. संताप, दुःख आणि हळहळ व्यक्त होत होती.

आईचा आक्रोश काळीज चिरणारा...

आयुषच्या अंत्यसंस्कारावेळी आई, आजोबा, नातेवाईक आणि ग्रामस्थांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. "माझ्या बाळाला उठव, माझं बाळ मला परत द्या" म्हणून आईचा हंबरडा ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले. आजोबांनी तर पोटच्या नातवाला छातीशी कवटाळून टाहो फोडला. निरागस बालकाचा असा अंत पाहून गावातील प्रत्येकजण सुन्न झाला होता. ज्या अंगणात ही दोन मुलं खेळायची, बागडायची, त्या अंगणात आता फक्त शांतता पसरली आहे.

पित्यानेच केला घात गावात संतापाची लाट..

या प्रकरणात पोलिसांनी संशयित पिता सोमनाथ दामोदर रोडगे (वय ४०) याला पहिल्या दिवशीच ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने पती-पत्नीत मुलांच्या संगोपनावरून नेहमी वाद होत असल्याचे सांगितले. त्याच रागातून दोन्ही मुलांना संपवल्याची आणि मृतदेह सापडू नयेत म्हणून कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीचाही जीव घेण्याचा विचार होता, मात्र ती सोबत न आल्याने ती वाचल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

ही माहिती समोर येताच गावात संतापाची लाट उसळली. "ज्या बापाच्या खांद्यावर मुलांनी खेळायचं, त्याच बापाने असं कसं केलं?" असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. पोटच्या मुलांवर असं क्रूर कृत्य करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

तपास करणारे पोलीसही चक्रावले!

पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांचा बळी गेल्याचे आरोपी सांगत असल्याने या घटनेचा तपास करणारे पोलीसही चक्रावले आहेत. केवळ कौटुंबिक वादातून एखादा बाप आपल्या पोटच्या दोन निरागस मुलांना असं संपवू शकतो का? हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांनाही पडला आहे. आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगत असल्याने, त्याच्या बोलण्यात विसंगती आढळत असल्याने पोलिसांचा गोंधळ वाढला आहे. त्यामुळे या अमानवी कृत्यामागे केवळ भांडण हेच कारण आहे की आणखी काही कटकारस्थान, जुना राग, आर्थिक तणाव किंवा इतर काही कारण आहे का, याचा पोलिस सखोल तपास करीत आहेत. आरोपीच्या मोबाईल, त्याच्या हालचाली आणि घटनेच्या आधीच्या दोन-तीन दिवसांतील वर्तन याचाही तपास केला जात आहे.

आई सुषमा रोडगे (वय २७) हिच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री सोमनाथ उर्फ परमेश्वर रोडगे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

श्यामवरही शोकाकुल वातावरणात अंत्यविधी, गाव सुन्न...

चॉकलेट, वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून दोन्ही भावंडांना दुचाकीवर बसवून जायकवाडी कालव्यात नेऊन फेकल्याचा आरोप आहे. ४८ तासांनंतर आयुषचा, तर तिसऱ्या दिवशी श्यामचा मृतदेह सापडला. पाचोड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सायंकाळी श्यामवर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांना शोक अनावर झाला. प्रत्येकजण हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. "आता या अंगणात पुन्हा ते हसणं, ते खेळणं कधीच दिसणार नाही" म्हणून वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांचे डोळे पाणावले होते.

एका क्षणाच्या रागाने दोन फुलं हिरावली...

पती-पत्नीत सतत होणाऱ्या कौटुंबिक वादातून घरात नेहमी तणाव होता. त्याच रागातून दोन निरागस चिमुकल्यांचा नाहक बळी गेल्याची चर्चा गावात आहे. एका क्षणाच्या रागाने, एका चुकीच्या निर्णयाने दोन फुलांसारखी मुलं हिरावली गेली. आईच्या कुशीत झोपणारी, बाबाच्या बोटाला धरून चालणारी ही मुलं आता फक्त आठवणीत राहिली आहेत. या घटनेने संपूर्ण पैठण तालुका हळहळला असून, "असं पुन्हा कधीच घडू नये" अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करीत आहे.

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचेही हात थरथरले...

अनेक मृतदेह पाहून, अनेक शवविच्छेदन करूनही ज्यांचे हात कधी थरथरले नाहीत, त्या डॉक्टरांचे हात यावेळी थरथरले. पाचोड ग्रामीण रुग्णालयात जेव्हा आयुष आणि श्याम या दोन चिमुकल्या भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले गेले, तेव्हा रुग्णालयातील वातावरणच बदलून गेले.

साधारणपणे शवविच्छेदन कक्षात शांतता असते. पण त्या दिवशी ती शांतता वेगळीच होती. जड, काळीज चिरणारी. टेबलवर पडलेले ते दोन छोटे-छोटे मृतदेह पाहून डॉक्टरांसह तेथील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. "एवढी निरागस मुलं... त्यांनी कोणाचं काय बिघडवलं होतं?" असे प्रश्न लोकांना पडत आहे.

पोलिसही चक्रावले - नेमकं कारण काय?

आरोपी सांगतोय एक, पण तपासात समोर येतंय वेगळंच. त्यामुळे "खरं कारण काय?" हाच प्रश्न पोलिसांसमोर आहे. पती-पत्नीच्या भांडणातून दोन मुलांचा बळी जाणं, ही गोष्ट पोलिसांनाही पटत नाहीये. त्यामुळे या घटनेची प्रत्येक बाजू तपासली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT