

पैठण : पैठण तालुक्यातील आपेगाव येथे चोरट्यांनी सलग दोन दिवस धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे. शेतात पाणी देत असलेल्या एका शेतकरी महिलेवर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच, दुसऱ्याच दिवशी या महिलेच्या मुलाची नवीकोरी मोटरसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या सलग चोऱ्यांमुळे आपेगाव आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी व महिलांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिला शेतकऱ्यावर हल्ला करून दागिने लुटले
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आपेगाव येथील शेतकरी महिला ताराबाई दिनकर ठेंनगे या शेतात सरकीला पाणी देत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवला. चोरट्यांनी त्यांना जखमी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या ताराबाईंवर पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून रविवारी त्यांना घरी आणण्यात आले होते.
पोलीस माघारी फिरताच दुचाकीची चोरी
या घटनेच्या तपासासाठी आणि जखमी महिलेच्या कुटुंबाकडे चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आपेगाव येथे आले होते. पोलीस पथक चौकशी करून माघारी फिरल्यानंतर रविवारी (दि. २७) रात्री दोन वाजेच्या सुमारास पुन्हा चोरीची घटना घडली. ताराबाईंचे पुत्र ज्ञानेश्वर दिनकर ठेंनगे यांनी घरासमोर उभी केलेली चार महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली मोटरसायकल (क्रमांक: MH-20-HL-7794) चोरट्यांनी लांबवली.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे व बीट जमादार राजेंद्र जिवडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर ठेंनगे यांच्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक गावात येऊन गेल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी चोरी करून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांनाच उघड आव्हान दिले आहे. त्यामुळे या धाडसी चोरट्यांचा छडा पैठण पोलीस कसा लावतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.