छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ – अजिंठा महोत्सव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. उद्घाटनाच्याच दिवशी या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. महानगर पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना समोरच्या रांगेत आणून बसवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि एका प्रोटोकॉल अधिकाऱ्याने थेट उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीना हात धरुन आसनावरून उठवले. कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून बोलावल्यानंतर अशा प्रकारे अपमान झाल्यामुळे उच्च न्यायालयातील आठही न्यायमूर्ती कुटुंबासह कार्यक्रमातून निघून गेले. यावेळी आयोजकांनी क्षमायाचना देखील केली. मात्र, न्यायमुर्तींनी यापुढे आम्हाला तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे ठासून सांगितले. Verul -Ajantha festival
वेरूळ – अजिंठा महोत्सवाचे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठितांसह उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींना देखील आमंत्रित करण्यात आले होते. प्रोटोकॉलप्रमाणे न्यायमूर्तींसाठी आसने राखून ठेवण्यात आली होती. जागतिक कीर्तीच्या तबलावादक अनुराधा पाल यांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम सुरू होणार होता. यावेळी व्यासपीठावर वादकांची तयारी सुरु होती. तर महानगर पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सुरक्षा रक्षकाने समोरच्या रांगेत बसलेल्या ज्येष्ठ न्यायमूर्तींना आसनावरुन उठवले. न्यायमूर्ती आसनावरून उठताच जी. श्रीकांत त्यांच्या आसनावर बसले. तेवढ्यात सुरक्षा रक्षकाने न्यायमूर्तींना हाताला धरुन मागच्या रांगेत जाण्यास सांगितले. हा भयंकर प्रकार बघून बाकीचे दोन न्यायमूर्ती त्याठिकाणी आले. त्यांनी न्यायमूर्तींना आसनावरून उठविल्याचा जाब विचारला. Ajantha-Verul festival
ज्येष्ठ न्यायमुर्तींना आसनावरुन उठविल्याचे पाहून आयोजक दिलीप शिंदे, पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांची धांदल उडाली. या दोघांनी न्यायमूर्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संतापलेल्या न्यायमूर्तींनी 'यापुढे आम्हाला आमंत्रण देऊ नका, आम्हाला बोलावू नका' असे सुनावत कुटुंबासह बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना आसनावरुन उठवत त्यांचा अपमान केल्याने कार्यक्रमाला आलेले सर्वच न्यायमूर्ती कुटुंबासह बाहेर पडले. न्यायमूर्ती भरकार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतरही महोत्सवात शेखी मिरवणारे अधिकारी मात्र जागेवरच बसून राहिले. न्यायमूर्तींना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्याचा राजशिष्टाचार देखील त्यांनी पार पाडला नाही.
हेही वाचा