छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरमधून गॅस गळती; परिसरात १४४ कलम लागू | पुढारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरमधून गॅस गळती; परिसरात १४४ कलम लागू

छत्रपती संभाजीनगर, (पुढारी वृत्तसेवा) : शहरातील वसंतराव नाईक चौकात आज सकाळी जालन्याकडे जाणारा भरधाव गॅस टँकर दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी दिले असून परिसरात कलम १४४ लागू केले आहे.

जालना रोड वसंतराव नाईक चौक उड्डान पुलाजवळ एन-४ सिडको येथे गुरूवारी सकाळी एच.पी.कंपनीच्या गॅस टँकरला अपघात झाला. या गॅस टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे. आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून कोणतीही जीवीत हानी होऊ नये यासाठी सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी निर्गमित केले आहेत.

हा आदेश १ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईल त्या कालावधी पर्यंत अंमलात राहिल. नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

Back to top button