SIR Voter Mapping | 3 लाखांवर मतदार ‘रडार’वर file photo
छत्रपती संभाजीनगर

SIR : शहरातील साडे चौदा हजार मतदार वगळले

सिल्लोड : तीन मतदान केंद्रांची वाढ, स्थलांतरित मतदारांची संख्या जास्त

पुढारी वृत्तसेवा

14,500 voters from the city excluded

राजू वैष्णव

सिल्लोड : एसआयआरमधील तपासणीत शहरातील तब्बल १४ हजार ७८५ नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. यात सर्वाधिक ५ हजार ६२९ मतदार स्थलांतरित आहे. शहरात एसआयआर तपासणी आधी ५५ हजार ६३१ मतदार होते. तर आता ४० हजार ८४६ मतदार राहिले असून जवळपास २५ टक्के मतदार शहरातील वगळण्यात आले आहे.

सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख ६४ हजार ७२७ मतदार होते. यात शहरात ५५ हजार ६३१ तर ग्रामीण भागात ३ लाख ९ हजार ९६ मतदार होते. मात्र निवडणूक आयोगाच्या मतदार यादी सर्वेक्षणात तब्बल ४७ हजार २६९ नावे वगळण्यात आली आहे. यात शहरातील १४ हजार ७८५ तर ग्रामीण भागातील ३२ हजार ४८४ नावे वगळण्यात आली आहे. शहरात २ हजार ८२९ नावे मयतांची, ५ हजार ६२९ स्थलांतरित, २ हजार ८९१ दुबार, पत्यावर न सापडलेले ३ हजार २७० तर इतर १६६ असे ऐकून १४ हजार ७८५ मतदार वगळण्यात आले आहे.

गेल्या दोन - तीन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुबार नावे असल्याच्या तक्रारी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर दुबार नावे असलेल्या मतदारांच्या याद्या देखील महसूल प्रशासनाला देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र प्रशासनाने याची कधी दखल घेतली नाही.

तर विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होत असल्याचा आरोप भाजप नेत्यांचा नेहमीच राहिलेला आहे. त्यात आता एसआयआरमध्ये शहरातील २५ टक्के मतदार वगळण्यात आल्याने भाजप नेत्यांच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे.

सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेली आहे. यात ४० हजार ८३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. नगरपालिका निवडणुकीत झालेले मतदान व आता एसआयआरच्या तपासणीनंतर शहरातील यादीतील एकूण मतदारांच्या संख्या जवळपास सारखीच आहे. आताच्या सुधारित यादीतील मतदार व नगरपालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची तुलना केली, तर नगरपालिकेत १०० टक्के मतदारांनी हक्क बजावला होता का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

आता ४०९ मतदान केंद्र

पूर्वी सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात ४०६ मतदान केंद्रे होती. मात्र ३ केंद्रांची वाढ करण्यात आल्याने आता ४०९ मतदान केंद्र राहणार आहे. मतदान केंद्रावर जास्त मतदार संख्या असली तर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागतात व काही मतदार हक्क बजावत नाही. यामुळे ३ केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. वगळलेले मतदार व ३ केंद्रांची वाढ करण्यात आल्याने केंद्रावरील मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी होणार आहे.

वगळलेल्या मतदारांचा फटका कुणाला ?

दरम्यान मतदार वगळण्यात आल्यापासून याचा फटका कुणाला ? अशी चर्चा रंगली आहे. यावरून राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांकडे बोट दाखवत आहे. २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून आ. अब्दुल सत्तार अवघ्या २ हजार ४०० मतांनी निवडून आलेले आहे. या निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे सर्वेक्षण झाले असते तर निकाल वेगळा लागला असता असा दावा आ. अब्दुल सत्तार यांच्या विरोधकांकडून केला जात आहे. असे असले तरी आ. अब्दुल सत्तार यांनी चौथ्यांदा गड सर करीत विरोधकांना चितपट केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT