Kharif crops : ७२ हजार हेक्टरवरील खरीप संकटात

पावसाची दडी पिकांनी टाकल्या माना : सोयाबीनचा फुलोरा गळू लागला; कपाशी, मूग, बाजरीची वाढ खुंटली
Kharif crops
Kharif crops : ७२ हजार हेक्टरवरील खरीप संकटातfile photo
Published on
Updated on

Kharif crops on 72,000 hectares at risk

रमाकांत बन्सोड

गंगापूर : पावसाळा सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी गंगापूर तालुक्यात समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस झालेला नाही. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने अक्षरशः दडी मारल्याने तालुक्यातील तब्बल ७२ हजार २५२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत.

Kharif crops
सरकारी निर्णयांसाठी ७ हजार याचिका; प्रशासकीय दिरंगाईवर खंडपीठाचा दणका

मका तुऱ्यात, सोयाबीन फुलोऱ्यात, तर कापूस वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

यंदा सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, मूग, बाजरीसह विविध खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित सातत्याने पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून, पंधरा दिवसांच्या मोठ्या खंडामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे.

Kharif crops
Ganeshotsav 2026 : संभाजीनगरात साकारला जाणार उज्जैन मंदिराचा देखावा

परिणामी अनेक शेतांमध्ये पाण्याचा तीव्र ताण निर्माण झाला असून, उभी पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. विशेषतः सोयाबीनची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना ओलाव्याअभावी फुले गळून पडू लागली आहेत. याचा थेट परिणाम शेंगा धरण्यावर होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कापसाची वाढही रखडली असून, वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या पिकाला पाण्याचा फटका बसत आहे. मका तुऱ्यात असताना ओलाव्याची कमतरता जाणवत असून, मूग आणि बाजरी पिकेही सुकण्याच्या मार्गावर आहेत.

काही भागांत पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली असून, वाढत्या उन्हामुळे परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. त्यातच विविध किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. महागडी बियाणे, रासायनिक खते, औषधे आणि वाढलेला मजुरी खर्च यामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

अनेकांनी कर्ज काढून आणि मोठा खर्च करून खरिपाची पेरणी केली. आता ही उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे. वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता यामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. तालुक्यातील सुमारे ७२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक आणि सातत्यपूर्ण पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर पीकनुकसानीची शक्यता आहे.

त्यामुळे कृषी विभाग आणि प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना कराव्यात, तसेच संभाव्य नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया वेळेत सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करावा. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी अधिकारी बापूराव जायभाये यांनी केले आहे.

पावसाची प्रतीक्षा; शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरशः आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. रिमझिम पावसाच्या भरवशावर तग धरून असलेल्या पिकांना आता जोरदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज आहे. पावसाची अनिश्चितता आणि वाढत्या उन्हामुळे पिके कोमेजण्याचे संकट निर्माण झाले आहे. खरीप पिके वाचली तर केलेला खर्च भरून निघेल आणि चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, पावसाने आणखी काही दिवस पाठ फिरविल्यास यंदाचा संपूर्ण खरीप हंगामच संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news