

Paper-based system alongside the smart ticketing system
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीने तिकीट व्यवस्थेत टप्पा गाठत आधुनिकतेचा एनसीएमसी तिकीटप्रणाली लागू केली; मात्र या व्यवस्थेला तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसला आहे. स्मार्ट कार्डमध्ये टॉप-अप केल्यानंतरही रक्कम अपडेट न होणे, बॅलेन्स शून्य दाखवणे व इतर तक्रारी वाढल्याने एसटीला पुन्हा कागदी तिकिटांचा वापर करण्याचे आदेश एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी (दि. २) देण्यात आले.
गुरुवारपासून (दि.३) वाहकांना महिला व ज्येष्ठांना कागदी तिकीट तर पूर्ण तिकीटधारकांना मशीनमधून तिकीट द्यावे लागणार आहे. यामुळे मशीनसोबत कागदी तिकिटांचा ट्रेही सोबत ठेवने बंधनकारक आहे. सवलतधारकांना १४ सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीने तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या सवलतधारकाना ३० सप्टेंबरपर्यंत NCMC पावती पाहून सवलतीचे तिकीट मिळणार आहे.
१ सप्टेंबरपासून सवलतधारकांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, कार्ड वापरताना येणाऱ्या अडचणींमुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली. कार्डमध्ये पैसे भरल्यानंतरही बॅलेन्स शून्य दाखवणे, कार्ड रीड न करणे व इतर कारणामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर तांत्रिक त्रुटी दूर होईपर्यंत जुन्या पद्धतीने तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, डिजिटल व्यवस्थेसोबत कागदी तिकीट व्यवस्थाही पुन्हा कार्यरत झाली आहे.
वाहकांवर दुहेरी जबाबदारी
एनसीएमसी प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहकांना आधीच नेटवर्क, कार्ड रीड न होणे आणि तिकीट निघण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता त्यात कागदी तिकिटांचा ट्रे सांभाळण्याची भर पडली आहे. गर्दीच्या वेळी एका बाजूला मशीनवर तिकीट काढणे आणि दुसऱ्या बाजूला कागदी तिकीट देणे, अशी दुहेरी कसरत वाहकांना करावी लागणार आहे. त्यामुळे 'स्मार्ट' तिकीट व्यवस्थेचा भार सध्या वाहकांच्या खांद्यावर दुप्पट झाला आहे.
पूर्ण तिकीटधारकांना मशीनच
सवलतधारकांना तांत्रिक अडचणीच्या परिस्थितीत कागदी तिकीट देण्याची मुभा असली, तरी पूर्ण तिकीट भरणाऱ्या प्रवाशांना मशीनमधूनच तिकीट देणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे वाहकांना दोन्ही व्यवस्था समांतरपणे हाताळावी लागणार आहे.
१४ सप्टेंबरपर्यंत दिलासा
एनसीएमसी प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसटी प्रशासनाला आता १४ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी मिळाला आहे. या काळात सवलतधारकांना जुन्या पद्धतीने तिकीट मिळणार आहे. दरम्यान, ३१ ऑगस्टपर्यंत सवलतीसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीची पावती ग्राह्य धरून सवलतीचे तिकीट देण्याची तरतूद करण्यात आली आहे-