बीड

Beed news | महावितरणला दिला अल्टिमेटम...: वीजप्रश्नांवर आमदार सुरेश धस आक्रमक

लातूर परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंत्यांसमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

पुढारी वृत्तसेवा

कडा : आष्टी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा, नवीन उपकेंद्रे,ट्रान्सफॉर्मर आणि सौर कृषी पंपांच्या प्रश्नांवर आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत थेट लातूर येथील महावितरण परिमंडळ कार्यालय गाठले. मुख्य अभियंता श्री.बुलबुले यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रलंबित वीज प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

आष्टी तालुक्यातील दादेगाव, बीडसांगवी तसेच पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे मंजूर झालेल्या नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे काम तातडीने पूर्ण करावे,अशी भूमिका आ.धस यांनी मांडली. या उपकेंद्रांमुळे शेतकऱ्यांच्या वारंवार खंडित होणाऱ्या व कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसह आ.धस यांच्या प्रमुख मागण्या

१) दादेगाव,बीडसांगवी व धनगर जवळका येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रे तातडीने कार्यान्वित करा.

२) आष्टा हरिनारायण व पोखरी येथील सबस्टेशनवर मंजूर ५ MVA ट्रान्सफॉर्मर त्वरित बसवा.

३) EDB योजनेत ६३ KVA ऐवजी १०० KVA व २०० KVA क्षमतेचे रोहित्र उपलब्ध करा.

४) सौर कृषी पंप योजनेत विद्युत क्षमता व पाण्याचा दाब यांचा योग्य समतोल राखा.

५) शेतकऱ्यांच्या वीज समस्यांवर संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्या.

शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज देण्याची मागणी..

मौजे आष्टा हरिनारायण व पोखरी येथील ३३/११ केव्ही सबस्टेशनवर मंजूर झालेला ५ MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावा,अशी मागणी करत आमदार धस यांनी परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने व अखंड वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्यात यावे अशी स्पष्ट सूचना दिल्या.

EDB योजनेवरही सविस्तर चर्चा..

महावितरणच्या नव्या EDB योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील घरगुती तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी अधिक क्षमतेची रोहित्रे उपलब्ध करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर ६३ KVA ऐवजी १०० KVA आणि २०० KVA क्षमतेची रोहित्रे उपलब्ध करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सौर पंप योजनेंतर्गत नियोजनाची गरज सोलर पंप योजनेत शेतकऱ्यांना लाभ देताना विद्युत क्षमता आणि पाण्याचा दाब यामध्ये समतोल राखणे आवश्यक असल्याचे सांगत,भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी योग्य तांत्रिक नियोजन करण्याची सूचना आमदार धस यांनी केली.

लवकरच संयुक्त बैठक

महावितरणचे अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि सोलर पंप प्रणालीचे मुख्य कार्याधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.या बैठकीत मतदारसंघातील सर्व प्रलंबित वीज प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

"शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज मिळालीच पाहिजे"...

आष्टी मतदारसंघात शेततळे,विहिरी,बंधारे आणि विविध जलसंधारण कामांमुळे सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे कृषीपंपांसाठी उच्च दाबाचा, दर्जेदार आणि विश्वासार्ह वीजपुरवठा ही काळाची गरज असल्याचे आमदार धस यांनी स्पष्ट केले. "शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेती सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असून कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही," असा इशाराही आमदार सुरेश धस यांनी महावितरण प्रशासनाला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT