

कडा : बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वीज पुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला की तात्काळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी अवकाळी पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. अशा परिस्थितीत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाज विस्कळीत होत आहे. अनेक ठिकाणी तासन्तास वीज गायब राहत असल्याने नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे.
वादळ, वारा आणि गारपिटीमुळे विजेची उपकरणे नादुरुस्त होत असल्याचे कारण महावितरणकडून सांगितले जात असले, तरी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा वेळेवर पूर्ववत होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे टीव्ही, फ्रिज, पंखे यांसारखी घरगुती उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
हॉटेल व्यावसायिक, किरकोळ दुकानदार तसेच छोट्या उद्योगांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. “वीज नसल्याने व्यवसाय ठप्प होतो, पण बिल मात्र वेळेवर भरावे लागते,” अशी नाराजी व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी तत्पर कारवाई केली जाते. बिल भरण्यास उशीर झाला तर दंड, नोटीस आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाते. मात्र दुसरीकडे अखंडित वीजपुरवठा देण्यात सातत्याने अपयश येत असल्याने ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.“ग्राहकांनी वेळेवर बिल भरायचे, पण महावितरणने वेळेवर सेवा द्यायची नाही का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले की, अलीकडील वादळामुळे काही ठिकाणी वीज खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. 24 तास पथके कार्यरत असून लवकरच परिस्थिती सुरळीत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मात्र राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत असताना ग्रामीण भागातील वीज व्यवस्थेत अद्याप सुधारणा का होत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वाढत्या उकाड्यात वारंवार होणारी बत्ती गुल आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.