

Pimpalner Power Substation
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील सुकापूर-बल्हाणे परिसरासह सुमारे १२५ गावांतील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दृष्टीने पिंपळनेर येथे अत्याधुनिक १३२/३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना उच्च दाबाने अधिक स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.
गेल्या साडेचार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जून २०२१ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियांना गती देत सुकापूर शिवारात सुमारे सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला.
या मुख्य उपकेंद्राअंतर्गत आणखी १५ ते १६ नवीन ३३/११ केव्ही सबस्टेशन उभारण्यात येणार असून, त्यामुळे कृषी पंपांसह घरगुती वीजपुरवठ्यात मोठी सुधारणा होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीज समस्येपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी जनतेला दिलेला शब्द पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली तसेच प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्यास आमदार मंजुळाताई गावीत, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. तसेच वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मनोज भावसार, उपकार्यकारी अभियंता योगेश काळे, सहाय्यक अभियंता किशोर कांबळे, सागर शिरोडे, विकास नवसारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शवली.