Kaij Salegaon Illegal Health Camp Pudhari
बीड

Beed News | साळेगावात विनापरवाना आरोग्य शिबिर ; तपासणी करणाऱ्या डॉक्टरकडे प्रमाणपत्रच नाही

उम्मीद एक नयी किरण आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्पर्श हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Kaij Salegaon Illegal Health Camp

गौतम बचुटे

केज : केज तालुक्यात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई सुरू असतानाच साळेगाव येथे आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता आरोग्य तपासणी शिबिर सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शिबिर बंद केले. विशेष म्हणजे, रुग्णांची तपासणी करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय पात्रतेसंदर्भातील कोणतीही कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करता आली नाहीत. मात्र, अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दि. ३१ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील हनुमान मंदिरात उम्मीद एक नयी किरण आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्पर्श हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रत्येक रुग्णाकडून ५० रुपये नोंदणी शुल्क आकारून तपासणीसाठी नोंदणी केली जात होती.

अत्याधुनिक एटीएम डिजिटल मशीनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जात असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत होता. यामध्ये ईसीजी, स्नायूंचे वस्तुमान, एसपीओ२, हिमोग्लोबिन, अस्थी, पल्स, रक्तदाब, चयापचय, तापमान, रक्तातील साखर, बॉडी फॅट, बीएमआय, शरीरातील पाण्याचे प्रमाण, बीएमआर यासह विविध प्रकारच्या सुमारे २० तपासण्यांचा समावेश होता. बाजारमूल्यानुसार चार ते पाच हजार रुपये खर्च येणाऱ्या तपासण्या अवघ्या ५०० रुपयांत केल्या जात असल्याचे सांगण्यात येत होते.

या शिबिराची माहिती मिळाल्यानंतर केजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिला कांबळे यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी शिबिर आयोजकांकडे आरोग्य तपासणीसाठी आवश्यक परवानगी, संबंधितांची शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांना कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ शिबिरातील तपासणीचे काम बंद केले.

तपासणी करणाऱ्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह

वैद्यकीय अधिकारी डॉ. शिला कांबळे यांनी चौकशी केली असता, सोनिया प्रकाश सैंदाने या महिलेने आपले शिक्षण बीएचएमएस झाल्याचे सांगितले. मात्र, तिच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते.

तसेच कृष्णा हरिदास मंजुळकर याने आपण डीएमएलटी पदविका प्राप्त केल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडेही संबंधित पदविकेचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे या शिबिरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी संबंधित व्यक्तींकडे आवश्यक पात्रता व अधिकृत मान्यता होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चौकशी करून कारवाई करणार

या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही

या विनापरवाना आरोग्य शिबिराबाबत आणि संबंधित व्यक्तींवर होणाऱ्या संभाव्य कारवाईबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

शिबिर बंद केले, मग कारवाईचे काय?

आरोग्य विभागाने वेळीच हस्तक्षेप करून विनापरवाना सुरू असलेले शिबिर बंद केले असले, तरी वैद्यकीय पात्रतेची कागदपत्रे सादर करू न शकलेल्या संबंधित व्यक्तींवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ शिबिर बंद करून प्रशासनाची जबाबदारी संपणार की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT