molestation case 
बीड

Molestation case in Beed : विवाहित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज: एका खाजगी शाळेत कार्यरत असलेल्या २२ वर्षीय विवाहित तरुणीचा रस्ता अडवून, तिच्या पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी २९ जून रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभी असताना, नानासाहेब शिवाजी बिक्कड हा त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH 44/G 2958) तेथे आला. त्याने गाडी थांबवून पीडितेजवळ जाऊन तिला "तू मला आवडतेस" असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने या मागणीला तीव्र विरोध केला असता, आरोपीने तिच्याशी झटापट केली. तिला खाली पाडून अंगावरील कपडे ओढत विनयभंग केला. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास, तुझ्या पतीला, मुलाला आणि सासऱ्यांना जीवे मारून टाकीन, पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवीन आणि तुलाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

अपहरणाची धमकी आणि आधीचा छळ

आरोपीने पीडितेला धमकी दिली आहे की, जर तिने स्वतःहून फोन करून शरीरसुखाची मागणी पूर्ण केली नाही, तर ती जिथे काम करते, तिथून तिला उचलून नेऊन अत्याचार करीन. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी देखील नानासाहेब बिक्कड याने पीडितेला फोन करून अनैतिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करत त्रास दिला होता.

पोलीस कारवाई

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी नानासाहेब शिवाजी बिक्कड याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ७४, ७५, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT