

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
एकलहरे रोड परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्यानंतर तक्रार केल्यास संपूर्ण गल्ली जाळून टाकण्याची धमकी देत काही युवकांनी दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी दोन संशयितांसह एका अनोळखी साथीदाराविरुद्ध विनयभंग, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी मनोज डोगळे ऊर्फ मनोहर, सोनू डोगळे दोघे (रा. चेहडी), नाशिकरोड व त्यांचा एक अनोळखी मित्र अशी संशयितांची नावे आहेत. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१०) सायंकाळी ६.३० च्या सुमारास १६ वर्षीय मुलगी घरातील कचरा टाकण्यासाठी गल्लीत गेली होती.
त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या सोनू व मनोज डोगळे यांनी तिची छेड काढली. सोनू याने मुलीचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढत गाडीवर बस असे म्हणत विनयभंग केला, तर मनोज याने तिच्या कमरेवर हात ठेवला.
घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्याने दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच रात्री ९.३०च्या सुमारास संशयित पुन्हा परिसरात आले. 'आमच्याविरुद्ध कोणी तक्रार केली तर संपूर्ण गल्ली जाळून टाकू,' अशी धमकी देत त्यांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी परिसरातील रुद्रा माने याला मारहाण केली.
त्याला वाचवण्यासाठी आलेल्या ऋषी माने यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. परिसरात सुरू असलेला हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या '११२' हेल्पलाइनवर संपर्क साधला.
पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले; मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत. नागरिकांनी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.