Crime News file photo
बीड

Beed crime news: बनावट आधारकार्ड, नोटरी आणि GPSच्या माध्यमातून थार चोरी करणाऱ्या टोळीचा गेवराई पोलिसांकडून पर्दाफाश

या गुन्ह्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : बनावट आधारकार्ड तयार करून नोटरीद्वारे महिंद्रा थार वाहनाची विक्री करणे आणि काही दिवसांनी वाहनात पूर्वीपासून बसवलेल्या GPSच्या मदतीने त्याचा मागोवा घेत दुसऱ्या चावीने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा गेवराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चोरीस गेलेली महिंद्रा थार तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली एर्टिगा कार जप्त करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर, गेवराई येथील राज भुराजी शिंदे यांनी २० जुलै २०२६ रोजी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी १५ जुलै रोजी बसवराव महादेव म्हासाळकर (रा. पुणे) यांच्या नावावरील महिंद्रा थार (क्र. MH-14-KS-5858) नोटरीद्वारे खरेदी केली होती. मात्र १९ जुलैच्या मध्यरात्री त्यांच्या घरासमोर उभी असलेली ही गाडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यानुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४६३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता-२०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी वाहनाच्या मूळ मालकाच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून त्यावर स्वतःचा फोटो लावला. त्यानंतर स्वतःलाच वाहनाचा मालक असल्याचे भासवत नोटरीद्वारे वाहनाची विक्री केली. वाहनाचा ताबा दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वाहनात पूर्वीपासून बसवलेल्या GPSच्या साहाय्याने लोकेशन मिळवून दुसऱ्या चावीचा वापर करत त्यांनी वाहन चोरी करून नेले.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड करीत आहेत. तपासादरम्यान २८ जुलै रोजी चोरीसाठी वापरण्यात आलेली एर्टिगा कार आणि एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेळा अहिल्यानगर येथे पथक पाठवून शिवडी तपोवन रोड परिसरातून चोरीस गेलेली महिंद्रा थार जप्त केली. तपासात आरोपींनी यापूर्वीही हीच गाडी नोटरीद्वारे दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विकल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय असून आणखी तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड, परि. पोलीस उपनिरीक्षक हिमांशु नागरे, पोहेकॉ. कल्याण राठोड, पोना अमोल सोनवणे, पोकॉ. अश्वीन (विक्की) सुरवसे आणि पोकॉ. ऋषिकेश पोटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT