

Employee's husband assaulted by institution head in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : संस्थाचालकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या इमारतीत थांबलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील अंथरवणपिंप्री येथे उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. या ठिकाणी स्वयंपाकी म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा चव्हाण यांनी संस्थाचालक दिनेश पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेल आहेत. यामुळे त्यांचा पगार सहा महिन्यापासून थांबवण्यात आला आहे. या प्रकरणात समाजकल्याण मधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात विचारणा करण्यासाठी सुरेखा चव्हाण यांचे पती सतीश राठोड हे बुधवारी दुपारी गेले होते.
ते अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांच्या दालनाबाहेर बसलेले असतांना त्या ठिकाणी संस्थाचालक दिनेश पवार आले, त्यावेळी या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी दिनेश पवार यांनी सतीश राठोड याला मारहाण केल्याचा व्हीडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणात सतीश राठोड यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिनेश पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न : दिनेश पवार
दरम्यान या प्रकरणात दिनेश पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर महिला कर्मचारी सतत तीन महिन्यांपासून गैरहजर राहत होती, तिला सात वेळा मुख्याध्यापकांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्याच कामासाठी कार्यालयात गेलो होतो. मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. मी शेतात काम करण्यासाठी कशाला सांगू? असे संस्थाचालक दिनेश पवार यांनी म्हटले आहे.
घरची धुणीभांडी करण्यासाठी दबाव
या प्रकरणातील महिला कर्मचारी सुरेखा चव्हाण यांना दिनेश पवार हा शाळेतील स्वयंपाकाच्या कामासोबतच घरी धुणी-भांडी, फरशी पुसणे, झाडू मारणे तसेच शेतात खुरपणी आणि कापुस वेचणीचे काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप सुरेखा चव्हाण यांनी केला आहे.