

Woman injured in brick attack dies; Crime of murder against four people, Thiya agitation of relatives
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात आणखी एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीला मारहाण का केली, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात वीट फेकून गंभीर जखमी करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी (१५ जुलै) तिचा मृत्यू झाल्याने या प्रकरणातील मारहाणीच्या गुन्ह्याचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले आहे.
मृत महिलेचे नाव यशोदा बालाजी राठोड (वय ५०, रा. चनई वडवस्ती, अंबाजोगाई) असे आहे. या प्रकरणी राणी बालाजी राठोड यांच्या फिर्यादीवरून सुभाष लष्करे, मंदाकिनी लष्करे, विश्व लष्करे आणि इंद्र लष्करे (सर्व रा. चनई वडरवस्ती) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीला आरोपींकडून मारहाण करण्यात आली होती.
याबाबत जाब विचारण्यासाठी यशोदा राठोड गेल्या असता आरोपी सुभाष लष्करे याने त्यांच्यावर वीट फेकली. डोक्यात वीट लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या रोहन माणिक आडे आणि फिर्यादी राणी राठोड यांनाही आरोपींकडून काठीने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी सुभाष लष्करे याला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब फड करत आहेत.
आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या
यशोदा राठोड यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी बुधवारी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.