बीड: गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांचा हा महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळा रविवारी (दि.२६ ऑक्टोबर) रोजी परळी येथे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बदामराव आबा पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेवराईत विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही बाळराजे पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.”
बदामराव पंडित यांच्या या प्रवेशामुळे गेवराई मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे गेवराई आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली असून, भाजपच्या संघटनात्मक बळाला मोठे पाठबळ मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
गेवराई तालुक्यात लोकनेते म्हणून ओळख असलेल्या बदामराव 'आबा' यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे, बदामराव पंडित यांच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.